गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ जगात कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. एखाद्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. यामध्ये आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीद्वारे ठोस निकाल तपासले जातात. आता अलाहाबाद विद्यापीठाच्या (AU) माजी विद्यार्थ्याने एक खास बायोसेन्सर विकसित केल्याचा दावा केला आहे. ज्यानुसार, घामाच्या नमुन्यांद्वारे (Sweat Samples) कोविड-19 संसर्ग ओळखणे शक्य आहे.
ग्रेटर नोएडा येथील क्वांटा कॅल्क्युलस येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले 34 वर्षीय अमित दुबे यांनी दावा केला आहे की, त्यांनी कोविडचा संसर्ग शोधण्यासाठी बायोमेडिकल आणि बायोसेन्सिंग ऍप्लिकेशन्ससाठी जगातील पहिले विशिष्ट, विश्वासार्ह अल्ट्रा-स्मॉल गोल्ड नॅनोक्लस्टर विकसित केले आहे. (हेही वाचा: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून पहिली मेड-इन-इंडिया एचपीव्ही लस लाँच)
सध्या कोरोनाचा संसर्ग ओळखण्यासाठी अनुनासिक किंवा घशाच्या स्वॅबचा वापर होणारे किट वापरले जाते. मात्र दुबे यांच्या या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या घामाचा वापर करून कोविड-19 चा शोध घेण्यास सक्षम असलेल्या प्रभावी आणि स्वस्त चाचणी किटचे नवीन युग येऊ शकते.
वायली (Wiley) यांनी प्रकाशित केलेल्या यूएस जर्नलमधील 'ल्युमिनेसेन्स: द जर्नल ऑफ बायोलॉजिकल अँड केमिकल ल्युमिनेसेन्स' मध्ये नुकतेच प्रकाशित झालेले आपले संशोधन शेअर करताना दुबे म्हणाले की, बायोसेन्सर हे एक-स्टेप आयडेंटिफिकेशन किंवा सेन्सिंग तंत्र असेल. अल्ट्रा-स्मॉल गोल्ड नॅनोक्लस्टरचा व्यास 2 nm पेक्षा कमी आहे. आपल्या अद्वितीय आकार-आश्रित भौतिक-रासायनिक गुणधर्मांमुळे हे उपकरण सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये मजबूत ल्युमिनेसेन्स आणि उत्कृष्ट जैव सुसंगतता समाविष्ट आहे.