Cervical Cancer होण्याच्या प्रमाणात घट मात्र, तपासणी आणि लसीकरण आवश्यक- डॉक्टरांचा सल्ला
Cervical Cancer | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Cervical Cancer News: जानेवारी हा गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. भारतासह, जागतिक स्तरावर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer) घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचे या विषयातील अभ्यासक, डॉक्टर्स आणि तज्ज्ञ सांगतात. असे असले तरी या प्रकारच्या कर्करोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अजूनही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ही खबरदारी आणि उपाययोजना याबाबत बोलताना वैद्यकीय व्यावसायिकांनी त्याचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक तपासणी आणि लसीकरणाच्या प्रयत्नांची गंभीर गरज अधोरेखित केली जात आहे.

गर्भाषयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये कमालीची घट:

इंडियन कॅन्सर सोसायटीचे डॉ. विनय देशमाने यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एका प्रतिक्रियेदरम्यान सांगितले की, मुंबईतील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये 2008 मधील आडेवारीच्या तुलनेत अलिकडील काळात मोठी घट झाली आहे. साधारण 12% महिला कर्करोगाच्या घटनांवरून सध्या 6% पर्यंत घट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा जीवनभर धोका 2008 मधील प्रति 66 पैकी 1 महिलांवरून 2017 मध्ये तो 114 महिलांमागे 1 इतका कमी झाला आहे. (हेही वाचा, Cancer Deaths in India: भारतामध्ये एका वर्षात कर्करोगामुळे तब्बल 9.3 लाख मृत्यू, समोर आली 12 लाख नवीन प्रकरणे- Lancet Study)

स्वच्छता, तपासणी आणि शिक्षण अतिशय महत्त्वाचे:

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधील डॉ. गौरवी मिश्रा भर देत सांगतात की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील एक महत्त्वाचा आरोग्य चिंतेचा विषय आहे. दरवर्षी 1.25 लाख नवीन प्रकरणे नोंदवली जातात आणि 70,000 हून अधिक मृत्यू या आजारामुळे होतात. डॉ. मिश्रा यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी जननेंद्रियाच्या स्वच्छतेवर, लवकर तपासणी आणि शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. (हेही वाचा, Breast Cancer च्या निदानात मोठं पाऊल; अंध महिलांच्या स्पर्शज्ञानाने कॅन्सरची गाठ सुरूवातीच्या टप्प्यातच ओळखणं शक्य! )

डब्ल्यूएचओचा दृष्टीकोन आणि शिफारसी:

इंडियन कॅन्सर सोसायटीचे विश्वस्त डॉ. पूर्णा कुरकुरे यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सर्वसमावेशक धोरणाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगितले. WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 90% मुलींनी 15 वर्षांच्या वयापर्यंत HPV लस घेतली पाहिजे, तर 35-45 वयोगटातील 70% महिलांनी HPV चाचणी घेतली पाहिजे. याव्यतिरिक्त, गर्भाशयाच्या ग्रीवेच्या आजाराचे निदान झालेल्या 90% स्त्रियांना पूर्व-केंद्रित जखम किंवा आक्रमक कर्करोगासाठी योग्य उपचार मिळाले पाहिजेत.

जागरूकता उपक्रम आणि लसीकरण कार्यक्रम:

इंडियन कॅन्सर सोसायटीने एचपीव्ही लसीकरणाच्या महत्त्वाविषयी आरोग्य सेवा प्रदाते आणि पालकांना शिक्षित करण्यासाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जागरूकता महिन्याच्या अनुषंगाने एक जागरूकता मोहीम सुरू केली आहे. डॉ. वंदना धामणकर यांनी एचपीव्ही लसीबद्दल पालकांचा संकोच दूर करण्यासाठी आणि भारताच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात त्याचा समावेश करण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतात. त्या म्हणतात महिलांनी गर्भाषयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत निश्चितता बाळगणे महत्त्वाचे आहे.