
कॅन्सरचे (Cancer) नाव ऐकताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी, कॅन्सरवरील पूर्ण उपचार अद्यापही समोर आलेले नाहीत हे वास्तव आहे. कर्करोगाच्या उपचारावर लाखो रुपये खर्च होतात, मोठ्या वेदनेला सामोरे जावे लागते, मात्र तरी शरीरातून या रोगाचे समूळ नष्ट होईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत कॅन्सरवरील लस आली तर त्याचा लाखो लोकांसाठी फायदा होऊ शकतो.
याबाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोविड-19 ची लस तयार करणाऱ्या वैज्ञानिक जोडप्याने 2030 पूर्वी जगाला कर्करोगावरील लस (Cancer Vaccine) मिळेल असा दावा केला आहे. शास्त्रज्ञ उगुर साहिन (Ugur Sahin) आणि त्यांची पत्नी ओझलेम टुरेशिया (Ozlem Tureci) यांनी बायो एन्टेकची स्थापना केली होती. याच बायोएन टेकने फायझर कंपनीच्या सहकार्याने कोविड-19 ची लस विकसित केली आहे. मेसेंजर आरएनएवर आधारित ही लस बहुतेक श्रीमंत देशांमध्ये अनेकांना दिली गेली आहे.
आता याहू न्यूजनुसार, प्रोफेसर उगुर साहिन आणि त्यांच्या पत्नीने बीबीसीसोबतच्या एका कार्यक्रमात सांगितले की, त्यांना नक्कीच वाटते की कर्करोगावरील उपचार किंवा कर्करोगाच्या रूग्णांचे जीवन बदलणारा उपचार लवकरच त्यांच्याकडे असेल. प्रोफेसर टुरेशिया म्हणाल्या, ‘कोविड-19 लसीच्या विकासादरम्यान शास्त्रज्ञांनी मिळवलेल्या यशावर कर्करोगाची लस आधारित असेल.’
त्यांनी पुढे असेही सांगितले की, आता फक्त 8 वर्षात कर्करोगाची लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकते. 2030 पूर्वी कर्करोगावरील लस जगात नक्कीच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैज्ञानिक जोडप्याने सांगितले की, अशी आशा आहे की, सध्या विकसित होणाऱ्या कर्करोगाच्या लसीमध्ये आताच्या मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकेल. (हेही वाचा: कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर अनेक कंपन्यांचे तापाचे औषधही चाचणीत फेल; 'या' गोळ्या खाण्यापूर्वी नाव पहा)
बायो एन्टेक प्रामुख्याने कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. प्रोफेसर साहिन यांनी सांगितले की, कोविड-19 ची लस विकसित करताना अनेक अनुभव घ्यावे लागले. कॅन्सरवरील संशोधनादरम्यान हे सर्व उपयोगी पडतील अशी आशा आहे.