Bharat Biotech on Covaxin's Side Effects: 'कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित, कोणतेही दुष्परिणाम नाहीत', भारत बायोटेकचे निवेदन
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

Bharat Biotech on Covaxin's Side Effects: ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या (AstraZeneca-Oxford) कोविशील्ड (Covishield) या कोविड लसीच्या संभाव्य दुर्मिळ दुष्परिणामांच्या अहवालांदरम्यान, भारत बायोटेकचे एक महत्वाचे विधान समोर आले आहे. कंपनीने सांगितले की, त्यांची कोवॅक्सिन (Covaxin) ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. एका निवेदनात भारत बायोटेकने म्हटले आहे की, ही लस ‘सुरक्षिततेवर प्रथम लक्ष केंद्रित करून’ विकसित करण्यात आली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सरकारच्या कोविड-19 लसीकरण कार्यक्रमातील कोवॅक्सिन ही ‘एकमेव कोविड लस’ आहे, ज्याची भारतात परिणामकारकतेची चाचणी घेण्यात आली.

कंपनीने सांगितले आहे की, सुरक्षिततेसोबतच यामध्ये कोरोना लस दिल्यानंतर होणारे परिणामही विचारात घेतले आहेत. भारत बायोटेकने पुढे म्हटले आहे की, लस विकसित करणाऱ्या टीमला हे चांगले ठाऊक होते की लसीची परिणामकारकता जरी कमी कालावधीसाठी असली तरी तिची सुरक्षितता लोकांवर आयुष्यभर परिणाम करू शकते. भारतामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी प्रामुख्याने कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसी दिल्या गेल्या होत्या.

भारत बायोटेकने म्हटले आहे की, परवाना प्रक्रियेदरम्यान, 27 हजारांहून अधिक लोकांवर कोवॅक्सिनचे मूल्यांकन केले गेले. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देखील कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन केले होते. या सर्व अभ्यासातून हे समोर आले आहे की, कोवॅक्सिनचा सुरक्षितता रेकॉर्ड खूप चांगला आहे. या लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत.

पहा पोस्ट-

दुसरीकडे, नुकतेच ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या न्यायालयासमोर मोठा खुलासा करत कबूल केले आहे की, त्यांच्या कोविशील्ड लसीमुळे काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. यामुळे प्लेटलेटची संख्या देखील कमी होऊ शकते. ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या फॉर्म्युलावर आधारीत सीरम इन्स्टिट्यूटने भारतामध्ये आपली कोविशील्ड लस बनवली आहे. अशाप्रकारे कोविशील्ड लसीशी संबंधित ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर भारत बायोटेकने आपली कोवॅक्सिन लस सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Covishield Side Effects: कोविशील्ड लस घेतल्यानंतर मुलींचे मृत्यू; आता पालक Serum Institute विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार खटला)

दुसरीकडे, नुकतेच एक संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कोविशील्ड कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली 11 संस्थांच्या संघाने एक अभ्यास केला. त्यात आढळून आले की, कोविशील्ड लसीने कोवॅक्सिनपेक्षा मजबूत रोगप्रतिकारक प्रतिसाद दर्शविला. या अभ्यासाचे निष्कर्ष 6 मार्च रोजी द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलमध्ये प्रकाशित झाले.