Covishield Side Effects: कोविशील्ड (Covishield) लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्या दोन भारतीय मुलींच्या पालकांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी भारतात लस विकणारी कंपनी ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) कोर्टात हे मान्य केले होते की, त्यांच्या लसीमुळे दुर्मिळ आजार होऊ शकतात. तसेच रक्ताच्या गुठळ्यांसह इतर काही साइड इफेक्ट्स दिसू शकतात. ॲस्ट्राझेनेकाने म्हटले आहे की, काही प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम किंवा टीटीएस (TTS) होऊ शकतो. या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
ॲस्ट्राझेनेकाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मृत मुलींच्या पालकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या फॉर्म्युलावर आधारीत सीरम इन्स्टिट्यूटने आपली कोविशील्ड लस बनवली आहे.
कोविशील्ड लस घेतल्यानंतर मरण पावलेल्या एका मुलीचे वडील वेणुगोपाल गोविंदन म्हणतात की, त्यांची मुलगी कारुण्या ही कोविशील्ड लस घेतल्यानंतर एक महिन्यानंतर जुलै 2021 मध्ये मरण पावली. कारुण्याच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सरकारने राष्ट्रीय समिती स्थापन केली होती. समितीने नंतर निष्कर्ष काढला की, कारुण्याच्या मृत्यूचे कारण लस असल्याचा पुरेसा पुरावा नाही. आता आता गोविंदन यांनी रिट याचिका दाखल करून, नुकसान भरपाई आणि त्यांच्या मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय मंडळ नेमण्याची मागणी केली आहे.
त्याचवेळी दुसऱ्या एका कुटुंबाने आरटीआयमध्ये म्हटले आहे की, टीटीएसमुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, 18 वर्षांच्या रितिकाचा मे 2021 मध्ये मृत्यू झाला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रितिकाने मे महिन्यात कोविशील्डचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 7 दिवसात रितिकाला खूप ताप आणि उलटीची तक्रार आली. एमआरआयमध्ये रितिकाला मेंदूमध्ये रक्त गोठले होते आणि तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचे उघड झाले. अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिचा मृत्यू झाला. कुटुंबाने पुढे सांगितले की, त्यांना डिसेंबर 2021 मध्ये आरटीआयद्वारे कळले की मुलीला थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम होता. (हेही वाचा: Covishield Vaccine : कोविड लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढला, आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले कारण)
आता ही दोन्ही कुटुंबे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. सुरक्षा चिंतेमुळे इथून पुढे यूकेमध्ये ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लस दिली जाणार नाही. दरम्यान, कोरोना लस कोविशील्डचा तपास करण्यासाठी बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोविशील्डच्या दुष्परिणामांची चौकशी करण्यासाठी तज्ञांचे पॅनेल तयार करण्याच्या सूचना दिल्या जाव्यात असे यामध्ये म्हटले आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. लसीकरणानंतर कोणाला इजा झाली तर त्याची भरपाई करणारी यंत्रणा तयार करावी, असेही ते म्हणाले.