आयुर्वेदातील (Ayurveda) औषधोपचारांबाबत केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जागरूकता वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये आयुर्वेदाची आवड आणि विश्वासार्हता वाढली आहे. कोरोनानंतर लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास बराच वाढला आहे. एवढेच नाही तर आयुर्वेद हा रोग टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. भारत सरकारचे आयुष मंत्रालय आता देशातील 37 शहरांमध्ये आयुर्वेदिक केंद्रे (Ayurveda Centers) उघडणार आहे. या शहरांमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या लष्करी किंवा कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ही केंद्रे उभारली जाणार आहेत. 1 मे 2022 पासून ही केंद्रे कार्यान्वित होतील, जेणेकरून लोकांना आयुर्वेद पद्धतीद्वारे आजारांवर उपचार मिळू शकतील.
आयुर्वेदाला आरोग्य संस्थांशी जोडण्यासाठी आयुष मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने नुकताच या संदर्भात संयुक्त निर्णय घेतला आहे. 01 मे 2022 पासून देशभरातील 37 कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद केंद्र कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभुमीवर आयुष मंत्रालय या 37 छावणी रुग्णालयांमध्ये कुशल आणि पात्र आयुर्वेद डॉक्टर आणि फार्मासिस्टची नियुक्ती करेल. त्यामुळे सशस्त्र दलाचे जवान, त्यांचे कुटुंबीय आणि सर्वसामान्य नागरिकांसह छावणीतील रहिवासी या रुग्णालयांमधून आयुर्वेदीय आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकतील.
या शहरांमध्ये उभारली जातील आयुर्वेद केंद्रे-
आग्रा, अलाहाबाद, बरेली, डेहराडून, महू, पंचमढी, शहाजहानपूर, जबलपूर, बदामी बाग, बरकपूर, अहमदाबाद, देहूरोड, खडकी, सिकंदराबाद, डगशाई, फिरोजपूर, जालंधर, जम्मू, जुतोघ, कसौली, खासयोल, सुबाथु, झाशी, बबिना, रुरकी, दानापूर, कम्पटी, राणीखेत, लॅन्सडाउन, रामगड, मथुरा, बेलगाम, मोरार, वेलिंग्टन, अमृतसर, बकलोह, डलहौसी (हेही वाचा: पेट्रोल-डिझेलनंतर आता औषधही महागले; Paracetamol सह 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार)
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्यात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा करार झाला. त्याद्वारे आयुष मंत्रालय आणि महासंचालनालय, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (DGAFMS) यांनी आयुर्वेद केंद्रे सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) रुग्णालयांतर्गत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.