Essential Medicines Price Hike: देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असून एलपीजी आणि सीएनजीच्या किमतीही वाढत आहेत. आता जीवनावश्यक औषधांची खरेदी करणाऱ्यांनाही महागाईची झळ बसणार आहे. एप्रिल महिन्यापासून 800 हून अधिक जीवनावश्यक औषधांच्या किमतीत 10 टक्के वाढ होणार आहे. ज्या औषधांच्या किमती वाढवल्या जाणार आहेत त्यात ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचा रोग आणि अशक्तपणा इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे एप्रिलपासून 800 हून अधिक अत्यावश्यक औषधे 10 टक्क्यांहून अधिक महाग होतील. औषधांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (हेही वाचा - Viral Video: रुग्णवाहिका न मिळाल्यान 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन वडिलांनी पायी पार केलं 10 किलोमीटर अंतर; आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, Watch Video)
1 एप्रिलपासून वाढणार किंमत -
पुढील महिन्यापासून पेनकिलर आणि पॅरासिटामॉल, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारख्या अत्यावश्यक औषधांसाठी आणखी पैसे खर्च करावे लागतील. नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) नुसार, घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे औषधांच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे. 1 एप्रिल 2022 पासून औषधांच्या किमती वाढणार आहेत. कोरोना महामारीपासून औषध उद्योग सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत होते. आता सरकारने शेड्यूल्ड औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढवण्यास मान्यता दिली आहे.
शेड्यूल ड्रग्ज म्हणजे काय?
शेड्यूल ड्रग्स ही अशी औषधे आहेत जी अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत येतात आणि अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीमुळे सरकार त्यांच्या किमती नियंत्रित करते. परवानगीशिवाय त्यांच्या किमती वाढवता येत नाहीत. आता सरकारने त्यांच्या किमती वाढवण्यास परवानगी दिली आहे. आता या अत्यावश्यक औषधांसाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.