वायू प्रदूषण (Air Pollution) हे संपूर्ण जगासाठी एक आव्हान बनले आहे. अगदी विकसित देशांपासून ते विकसनशील, गरीब देश विषारी हवेशी झुंज देत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. आता नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलेली बाब ही जगासाठी अजून चिंताजनक बनली आहे. एका नवीन अभ्यासानुसार, जगातील एक टक्क्यांहून कमी लोक प्रदूषणमुक्त हवेत श्वास घेत आहेत. म्हणजेच जगातील फक्त 1 टक्के हवाच स्वच्छ, प्रदूषण विरहित आहे.
लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालानुसार, जागतिक क्षेत्राच्या 99.82 टक्के भाग पार्टिक्युलेट मॅटर 2.5 (PM 2.5) च्या धोकादायक पातळीच्या संपर्कात आहे, जे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्धारित केलेल्या सुरक्षा मर्यादेपेक्षा जास्त आहे. अहवालात असे आढळून आले की, जगातील केवळ 0.001 टक्के लोक श्वासोच्छवासासाठी शुद्ध मानली जाणारी हवा घेत आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासात जगभरातील 5,000 हून अधिक मॉनिटरिंग स्टेशन आणि मशीन लर्निंग सिम्युलेशन, हवामानविषयक डेटा आणि भौगोलिक घटकांचा वापर करण्यात आला. ज्याद्वारे शास्त्रज्ञांनी ग्लोबल पीएम 2.5 बद्दल अंदाज वर्तवला आहे. शास्त्रज्ञांना अभ्यासादरम्यान असे आढळून आले की, 2019 मध्ये, जागतिक स्तरावर 70 टक्क्यांहून अधिक दिवसांमध्ये दैनंदिन PM2.5 चे मूल्य प्रति घनमीटर 15 मायक्रोग्रामपेक्षा जास्त होते. हे डब्ल्यूएचओने निर्धारित केलेल्या दैनिक मर्यादेपेक्षा जास्त होते.
दक्षिण आशिया आणि पूर्व आशिया सारख्या प्रदेशांमध्ये हवेची गुणवत्ता विशेष चिंतेची बाब असल्याचे शास्त्रज्ञांना या अभ्यासात आढळून आले आहे. येथे, पीएम 2.5 पातळी 90 टक्क्यांहून अधिक दिवस 15 मायक्रोग्राम मर्यादेपेक्षा जास्त होती. हे सूक्ष्म कण वाहनातील काजळी, जंगलातील आग, धूर आणि राख, बायोमास कूक-स्टोव्ह प्रदूषण, वीज निर्मिती आणि वाळवंटातील धूळ यापासून सल्फेट एरोसोलने बनलेले असतात. (हेही वाचा: Influenza Virus: कोविड सारखा पसरत आहे इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2; वृद्धांनी काळजी घेण्याचा माजी एम्स प्रमुखांचा सल्ला)
अभ्यासात असे म्हटले आहे की पीएम 2.5 मध्ये अचानक वाढ होणे हे रोग आणि मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील एक प्रमुख कारण आहे. आशियाई देशांना आरोग्याच्या काही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असेही अभ्यासात म्हटले आहे. शास्त्रज्ञ पीएम 2.5 हे कर्करोग आणि हृदयविकाराचे कारण मानतात.