परतीच्या पावसामुळे ऑक्टोबर हिट हा म्हणावा तितका जाणवला नाही. मात्र थंडीला मात्र हळूहळू सुरुवात होताना दिसतेय. थंडी (Winter) सुरु झाली की त्वचेच्या समस्याही उद्भवू लागतात. या त्वचेला कोरडी पडणे, निस्तेज होणे, रुक्ष होणे, त्वचेवर खाज येणे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी अनेकदा लोक विशेषत: महिला त्वचेवर मॉयश्चरायजर लावून हा कोरडेपणा कमी करतात. थंडीत शरीरावर अथवा चेह-यावर कोरडेपणा येण्यास सुरुवात होते यावर अनेकदा त्वचा पांढरीही दिसते. म्हणून पटकन मॉयश्चरायजर हा सर्वांसाठी पहिला उपाय असतो. मात्र आपण घरच्या घरी ही काही सोप्या उपायांनी त्वचेचा कोरडेपणा दूर करु शकता.
थंडीत सर्वांना निर्माण होणा-या हा समस्येचे निराकरण करण्यासाठी लेटेस्टली मराठी ने मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट विनायक वरदे यांच्याशी खास बातचीत केली. त्यावर त्यांनी घरी करता येईल किंवा मेडिकलमध्ये उपलब्ध होईल असे 5 सोपे उपाय सांगितले.
चला तर मग पाहूयात कोणते आहेत हे उपाय:
1. मॉयश्चरायजर ऐवजी तुम्ही घरच्या घरी खोबरेल तेलही वापरू शकता. बाजारातून विकत घेतलेल्या खोबरेल तेलामध्ये केमिकल्स असण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही घरातील ओल्या नारळाचा खिस करुन तो खिस गॅसवर मंद आचेवर गरम करावा. त्यानंतर हळूहळू त्यातील अर्क किंवा तेल येण्यास सुरुवात होईल. साधारण 15-20 मिनिटानंतर गॅस बंद करून तो खिस थंड झाल्यावर एक टोपात तो हाताने पिळून त्यातील तेल काढावे. हे तेल आपल्या चेह-याला अथवा शरीरावर आपण लावू शकतो.
2. तसेच तुम्ही Dosetel ही क्रीमही त्वचेवर वापरू शकता. ही क्रीम मेडिकल सहजपणे उपलब्ध होते. तुमचे पांढरेशुभ्र चमकदार दात या 5 कारणांमुळे होतात खराब
3. Johnson & Johnson चे बेबी ऑइल हे देखील कोरड्या त्वचेसाठी उत्तम उपाय आहे.
4. जर तुमच्या कडे घरगुती खोबरेल तेल बनविण्याइतका वेळ नसेल तर तुम्ही दुधावरची सायही वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला दुधावरच्या सायीत चिमूटभर हळद आणि 1-2 ग्लिसरीनचे थेंब टाकावे. त्यानंतर ते मिश्रण रात्री झोपताना आपल्या चेह-यावर अथवा त्वचेवर लावावे. सकाळी उठल्यावर त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. तुमची त्वचा खूप तजेलदार दिसेल तसेच त्वचेचा कोरडेपणाही कमी होईल.
5. सकाळी वातावरणात थोडी उष्णता असते तसेच तेलातही उष्णता असते. त्यामुळे त्वचेवर फोड येण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो वर सांगितलेला हा रात्री करावा.
हे उपाय जर तुम्ही पहिल्यांदाचा वापरणार असाल तर ते तुम्ही तुमच्या हात किंवा पायावर वापरुन पाहा. जर ते तुम्हाला सूट झाले तर तुम्ही ते चेह-यावर वापरू शकता. पण जर तुम्हाला त्वचेचे अन्य आजार असतील, तर सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन हे उपाय केलेले बरे. या आणि मेकअप, हेअरस्टाईल्सची संबंधित अनेक स्टोरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. त्याआधी तुम्हाला हा लेख कसा वाटला हे जरुर कळवा.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)