जगभरात कोरोना व्हायरस मागील 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून थैमान घालत आहे. हळूहळू या कोरोना व्हायरस (Coronavirus) सोबतच जगायला शिकणारे आपण मागील काही दिवसांपासून अनेक चढ- उतारांवरून गेलो आहोत. 'न्यू नॉर्मल' स्वीकारताना अजूनही अनेकांची तारांबळ होत आहे. घरातूनच शाळा, वर्क फ्रॉम होम या संकल्पना आपल्यासाठी नवीन आहेत. सुरूवातीला सुखावणार्या या गोष्टी आता डोकेदुखी बनत आहे. प्रामुख्याने महिलांसाठी घर आणि करियर दोन्ही एकाच छताखाली सांभाळताना त्यांची कसरत होत आहे. यामधून वाढता ताण (Stress) केवळ आपल्या शारिरीक आरोग्यासाठी नव्हे तर मानसिक आरोग्याला देखील हानिकारक आहे. त्यामुळे सध्या जगभरात कोरोना संकटासोबत झुंजता झुंजता मानसिक आरोग्य कोलमडल्याचा ट्रेंड दिसत आहे. म्हणून यंदाच्या मानसिक आरोग्य दिनी (World Mental Health Day) या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कोणत्या खास टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे हे देखील नक्की जाणून घ्या.
मानसिक आरोग्य जपणं हे आपल्या शारिरीक आरोग्याइअतकेच महत्त्वाचे आहे. लहानसहान लाईफस्टाईल बदलांमधून तुम्हांला त्याचे संकेत मिळत असतात पण ते तुम्हांला ओळखता आले पाहिजेत. काही आजारांमध्ये तुम्हांला त्यावर पूर्ण मात मिळवणं कठीण आहे. पण लाईफस्टाईलमध्ये आहारामध्ये बदल करून त्याच्या लक्षणांची तीव्रता कमी करता येऊ शक्ते त्यामुळे या टीप्स लक्षात ठेवा. WHO ने दिला Pandemic Fatigue बाबत सतर्क राहण्याचा इशारा; कोरोना संकटामुळे चिडचिड, अनुत्साही वाटणं या मानसिक आरोग्यावर परिणाम करणार्या समस्यांशी कसा कराल सामना?
कोविड 19 च्या संकटात तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्याल?
- आहार
आहार हा मानसिक आरोग्यासाठीदेखील महत्त्वाचा असतो. अनेकदा मेंदुतील रासायनिक असंतुलन हे देखील मानसिक आरोग्याच्या समस्या जडण्याचं कारण आहे. त्यामुळे विटॅमिन बी 12 युक्त पदार्थांचा आहारात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. यामध्ये अंड, दूध, बदाम, चीझ यांचा समावेश होतो.
- योगसाधना
मानसिक आजार दूर ठेवण्यासाठी काही योगासनं देखील मदत करू शकतात. यामध्ये बद्धकोनासन, सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन अशा योगासनांचा समावेश होऊ शकतो. दरम्यान प्राणायम देखील मनाची अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते.
- स्वतःला कमी लेखणं टाळा
कोविड 19 मध्ये न्यू नॉर्मल स्वीकारत तुमच्या प्रत्येक कामात 100% देणं सध्या अनेकांना कठीण जात आहे. मल्टी टास्किंग करणं सगळ्यांनाच एका फटक्यात शिकता येईल असं नाही. त्यामुळे तुमच्या आणि इतरांच्या चूका समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा त्यातून नवं शिका.
- सकारात्मक विचार
आजकाल सोशल मीडीयाच्या अतिवापरामुळे अनावश्यक आणि चूकीची माहिती यांचा देखील सातत्याने भडीमार होत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक गोष्टींबद्दल भीती वाटणं, काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मात्र या सार्यातून निर्माण होणार्या नकारात्मक विचारांना दूर सारण्यासाठी वेळ काढून काही सकारात्मक गोष्टी पहा, वाचा आणि ऐकायला शिका. यामुळे तुमच्यामधील आशावाद कायम राहील.
- गोष्टी गृहित धरणं टाळा
कोणतीही गोष्ट गृहित धरणं सध्या टाळा. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या, त्यांचं मन मोकळं करायला मदत करा. त्यांच्या बोलण्यावर लगेच टीका करणं, त्या चूकीच्या कशा आहेत किंवा दुर्लक्ष करणं, हसण्यावारी नेणं या गोष्टी टाळा. समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करायला शिका. अनेक गोष्टींवर काळ हेच उत्तर असल्याने तो काळ निघून गेल्यानंतर पुन्हा सारं सुरळीत होऊ शकतो.
- संवाद
संवाद हा सध्या लॉकडाऊनच्या काळात गरजेचा आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातील वयोवृद्ध व्यक्तींना प्रामुख्याने दूर ठेवलं जातं आहे त्यामुळे अनेक नातवंडांची त्यांच्या आजी-आजोबांसोबत भेट झालेली नसेल. अनेकजण त्यांच्या पालकांपासून दूर असतीलपण प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरीही आता व्हर्च्युअल जगात भेटा,बोला. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मानसिक आरोग्य जपणं ही आपली स्वतःची जबबदारी आहे. त्यामुळे ती स्वीकारा आणि 100% त्याबाबत जागृत रहा. सातत्याने तुम्हांला मानसिक आरोग्य ढासळत असल्याचं जाणवत असेल तर मानसोपचारांची मदत घ्यायला घाबरू किंवा लाजू नका. तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजुच्या कुटुंबाच्या व्यक्तींच्या मूड स्विंगवरही लक्ष ठेवा. मानसिक आजारामध्ये नेहमीच्या वागणूकीतील बदल अनेकदा मोठे संकेत देतात. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल जागृत असणं गरजेचे आहे.