Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary (फोटो सौजन्य - File Image)

Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे ज्येष्ठ पुत्र होते. 14 मे 1665 रोजी जन्मलेले संभाजी हे 1681 ते 1689 पर्यंत राज्य करणारे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. 11 मार्च 1689 रोजी, इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने संभाजी महाराजांना मुघल प्रशासक औरंगजेबाने ठार मारले. त्यामुळे दरवर्षी 11 मार्च रोजी शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.

छत्रपती संभाजी महाराज यांची कहाणी ही शौर्य, वाद आणि शोकांतिकेने विणलेली एक गाथा आहे. त्यांची जीवनकथा केवळ भारतीय इतिहासातील एक अध्याय नाही तर एक अशी कथा आहे जी विशेषतः महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला प्रेरणा देत राहते. 1665 मध्ये जन्मलेले संभाजी लहानपणापासूनच राजकीय कारवाया आणि लष्करी मोहिमांच्या भोवऱ्यात ढकलले गेले होते. 1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर, अंतर्गत असंतोष आणि बाह्य धोक्यांमधून संभाजी सिंहासनावर बसले. त्यानंतर त्यांनी मुघलांविरोधात अनेक लढाया केल्या आणि त्या जिंकल्या देखील. दख्खन प्रदेशातून मुघलांचा नायनाट करण्यात संभाजी महाराजांची मोठी भूमिका होती. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2025: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाची तारीख, इतिहास आणि महत्त्व)

वेदनादायक मृत्यू -

दरम्यान, 1689 मध्ये, विश्वासघाताने संभाजी महाराजांना मुघल सैन्याने पकडले. त्यानंतर संभाजींचा छळ आणि मृत्युदंड शब्दांपलीकडे क्रूर होता. संभाजी महाराजांचा मृत्यू केवळ शारीरिकदृष्ट्या वेदनादायक नव्हता तर मराठा साम्राज्यावर खोलवर घाव घालणारा होता. औरंगजेबाने त्यांना कैद केले आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी त्यांना कठोर यातना दिल्या. परंतु, तरी शंभूराजांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. (Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas 2024: कधी आहे बलिदान दिन? घ्या जाणून)

संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले. त्यामुळे त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात बलिदान मास पाळण्याची देखील प्रथा आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांचा 40 दिवस अमानुष छळ केला. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या आधी 40 दिवस बलिदान मास पाळण्यात येतो. या काळात शंभूभक्त आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करून बलिदान मास पाळून संभाजी महाराजांना आदरांजली वाहतात.