आज 13 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पंधरवड्याला सुरुवात झाली असून उद्या (१४ सप्टेंबर) पासून पितृपक्षातील (Pitru Paksh Shraddha) तिथी व श्राद्ध सुरु होतील. पुढील दोन आठवडे म्हणजेच 28 सप्टेंबर पर्यंत पितृपक्षाच्या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांच्या स्मरणार्थ तिथीनुसार भोजन दान करण्याची प्रथा आहे. असं म्हणतात की, पितृपक्षच्या कालावधीत आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येतात, यावेळी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना नैवैद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी पूर्वजांचे प्रतीक म्ह्णून प्राण्यांना भोजन दिले जाते, यामध्ये कावळ्याचा मान तर अगदी विशेष असतो. याशिवाय कुत्रा, गाय या प्राण्यांना सुद्धा नैवद्य दाखवण्याची पद्धत आहे. खरंतर इतर वेळेस ज्या कावळ्याला अशुभतेचे प्रतीक मानले जाते त्याला श्राद्ध व पिंडदानाच्या दिवशी इतके महत्व का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
चला तर मग जाणून घेऊयात यामागील खास कारणे..
- असं म्हणतात, की ज्याप्रमाणे माणसांना उजेडात पाहण्याची दृष्टी आहे, वटवाघूळ व घुबडाला अंधारात पाहण्याची दृष्टी आहे तसेच कावळ्याला जीवात्मा पाहण्याचे वरदान लाभले आहे.
-कावळा हा यमदेवाच्या दरबाराचा द्वारपाल मानला जातो त्यामुळे जोपर्यंत कावळा पिंडाला स्पर्श करत नाही तोपर्यंत आत्म्याला यमलोकी प्रवेश मिळत नाही.
-पितृपक्ष हा अशुभ काळ असल्याने यावेळी अविष्ठ खाणाऱ्यांना भोजन दान करण्याची प्रथा असल्याने कावळ्याचे महत्व आहे. (Pitru Paksha 2019: हिंदू धर्मियांमध्ये पितृ पक्षाला का आहे एवढे महत्व? जाणून घ्या यंदाची तिथी आणि संबंधित इतिहास)
- हिंदू पुराणात कावळ्याला विशेष स्थान आहे. असं म्हणतात की इंद्राचा पुत्र जयंत याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते. त्रेता युगात या जयंताने सीतेला टोचल्याने प्रभू श्रीरामाचा रोष ओढवला होता. रामाने जयंताला बाण मारून त्याचा डोळा फोडला होता मात्र या कृत्यांनंतर जयंत प्रभू रामाला क्षरण आला. त्यावेळी रामाने त्याला जीवात्मा दिसण्याच्या दृष्टीचे वरदान दिले. तसेच तुला अर्पण केलेले भोजन पितरांना लाभेल असेही सांगितले. त्यामुळेच आजही कावळ्याचा पिंडाला स्पर्श महत्वाचा ,मानला जातो.
- ग्रीक कथांमध्ये रेवन तसेच नॉर्स पुरणात रेवन हगिन व मुनीन यांना देखील देवाच्या जवळचे जीव मानले जाते. (Pitru Paksha 2019 Dates: पितृपंधरवडा 2019 मध्ये पहा कोणत्या तिथीचं श्राद्ध कधी असेल?)
- याशिवाय गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याचे मानले जाते तर कुत्रा हा अतिशय निष्ठावंत प्राणी असल्याने याही प्राण्यांना भोजन दान करण्याची पद्धत आहे.
दरम्यान, पितृपंधरवड्यात तिर्यक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने शुभ कार्य टाळली जातात तसेच पितरांच्या मृतात्म्यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते.