Pitru Paksha 2019: हिंदू धर्मियांमध्ये पितृ पक्षाला का आहे एवढे महत्व? जाणून घ्या यंदाची तिथी आणि संबंधित इतिहास
पितृ पक्ष 2019 (Photo Credits: Wikimedia Commons)

भाद्रपद (Bhadrpad)  महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेपासून पितृ पक्षाची (Pitru  Paksh) सुरुवात होते. यानुसार यंदा 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी पितृ पक्ष सुरु होणार आहे. शुक्ल पक्षातील श्राद्ध पौर्णिमेपासून पुढील सोळा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावास्येपर्यंत (Sarv Pitru Amavasya)  हिंदू धर्मिय आपल्या दिवंगत पूर्वजांचे म्हणजेच पित्रांचे पूजन करतात. पूर्वजांच्या स्मरणार्थ त्यांना आवडीचे खास भोजन श्राद्धच्या वाडीच्या रूपात अर्पण केले जाते. असं म्हणतात की श्राद्धाच्या निमित्ताने पूर्वज आपल्या नातेवाईक व कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात, त्यांना यथातिथ्य आदर सन्मान करून तसेच भोजन देऊन कुटुंबीय त्यांना श्रद्धांजली वाहतात. हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या अशा या पर्वाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

पितृ पक्ष तिथी

पितृ पक्ष तिथी आरंभ: 14 सप्टेंबर, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांपासून सुरुवात

सर्वपित्री अमावस्या: 28 सप्टेंबर रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी समाप्ती

पितृ पक्ष आणि पुराण कथा

भारतीय पुराण व महाकाव्य रामायण महाभारताचा आढावा घेतल्यास आपल्याला त्यातही पितृ पक्षाशी संबंधित दाखले आढळतात. असं म्हणतात, की कौरव- पांडवांचे युद्ध संपल्यावर कर्णाचा मृत्यू झाला होता. यावेळी त्याला श्राद्धाच्या दिनी भोजनाच्या ऐवजी सोने, चांदी व दागदागिने अर्पण करण्यात आले. याबाबत कर्णाने इंद्राला कारण विचारले. यावर इंद्राने उत्तर देत कर्णाला सांगितले की, तू आयुष्यभर लोकांना सोने, चांदी, हिरे यांचे दान केलेस मात्र आपल्या पूर्वजांच्या नावाने कधीही भोजन दान केले नाहीस त्यामुळे आता तुलाही हाच प्रसाद अर्पण केला जात आहे. यावर कर्णाने आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी काहीच माहित नसल्याने असे करणे शक्य झाले नाही असे सांगून आपली बाजू मांडली. इंद्राने देखील मग त्याला 16 दिवसांचा अवधी देत पुन्हा भूतलावर धाडले जिथे कर्णाने आपल्या पूर्वजांचे ऋण फेडत सर्वाना भोजनदान केले.

पितृ पक्ष आणि श्राद्ध तिथी

आपल्या पूर्वजांचे ज्या दिवशी निधन झाले आहे त्या तिथीनुसार या कालावधीत श्राद्ध केले जाते. जर का आपल्याला मृतुयु तिथीत ज्ञात नसेल तर सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणे हा हि एक पर्याय असतो. अन्यथा प्रत्येक दिवसाप्रमाणे सुवासिनी, विवाहित पुरुष, अपघाती मृत्यू झालेल्याचे श्राद्ध पार पडते. असं म्हणतात, की मृत व्यक्तीचे श्राद्ध हे पुढील तीन पिढ्यांकरता करणे आवश्यक असते.

(टीप- संबंधित लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे व हिंदू दिनदर्शिकेतील तिथीनुसार देण्यात आला आहे, यातून लेटेस्टली मराठी अंधश्रद्धेची पुष्टी करत नाही)