हिंदू धर्मीयांसाठी दिवाळीचा सण हा सर्वात मोठा असतो. यंदा कोरोनाची 2 अंधकारमय दोन वर्ष आणि कटू आठवणी बाजूला सारत सार्या जगात भारतीय दिवाळी सेलिब्रेशनची तयारी करत आहे. दिवाळीचे 5 दिवस आनंदात साजरे करण्यासाठी अनेक प्लॅन्स बनवले जात आहे. पण यावर्षी 3-4 दिवसच साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यादिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान (Abhyang Snan) करण्याची रित आहे. मग दिवाळी दिवशी अभ्यंगस्नानाचा मुहूर्त पाहा पहाटेला किती वाजता आहे?
पुराणकथांनुसार, नरकात जाण्यापासून वाचण्यासाठी नरक चतुर्दशी दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून राक्षसरूपी 'कारेटं' चिरडून हा सण साजरा केला जातो. पूर्वी दिवाळी म्हटली की कडाक्याची थंडी असे. अशा थंडीच्या दिवसात पहाटे लवकर उठून गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले जात असे. त्यासाठी अंगाला आधी सुगंधी तेलाचा मसाज आणि नंतर उटण्याने आंघोळ करण्याची प्रथा आहे.
अभ्यंगस्नान मुहूर्त किती वाजता?
नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान करण्यासाठी द्रिक पंचांगनुसार, 24 ऑक्टोबर दिवशी पहाटे 05:22 AM ते 06:35 AM दरम्यान अभ्यंगस्नान केले जाऊ शकते. अभ्यंगस्नाना दिवशी पहाटे चंद्रोदय 5.22 चा आहे. तर चतुर्दशी तिथीची सुरूवात 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी होणार असून समाप्ती 24 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांची आहे.
पौराणिक कथा पाहिल्यास नरकासुराच्या वधानंतर सत्यभामाने भगवान श्रीकृष्णाला पवित्र स्नान घातले. नरकासुराविरुद्ध आपल्या विजय साजरा करण्यासाठी त्याने भाळी त्याचे रक्त लावले होते. यानंतर श्रीकृष्णाच्या कपाळावरील नरकासुराच्या रक्ताचे डाग पुसून टाकण्यासाठी अभ्यंगस्नान घालण्यात आले. तेव्हापासून अभ्यंगस्नानाची प्रथा सुरु झाली. या स्नानामागील अर्थ म्हणजे शरीर आणि मनातून वाईट शक्ती, विचार दूर सारणे. त्यामुळे दिवाळी सणादिवशी तुमच्या मनातूनही वाईट विचार काढून टाकत नव्या सकारात्मक उर्जेने दिवसाची सुरूवात करा.