COVID-19 Pandemic सोबत यंदा  शारदीय नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हा आगामी सणासुदीचा काळ सेलिब्रेट करताना सुरक्षित राहण्यासाठी या 5 गोष्टींबाबत दक्ष रहाच!
Coronavirus In Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये 17 ऑक्टोबरपासून घटस्थापना करून देशात सणासुदीचा काळ सुरू आहे. शारदीय नवरात्रीमधील (Navratri) नऊ दिवसांची धूम, दसरा, कोजागिरी पौर्णिमा पुढे दिवाळी (Diwali) अशी सणांची रेलचेल सुरू होत आहे. त्यामुळे मागील 6-7 महिन्यांपासून कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown), वर्क फ्रॉम होम मुळे प्रेशर खाली असलेले अनेक नोकरदार मंडळी सेलिब्रेशन साठी सज्ज होत आहेत. तुम्हीपण त्यापैकी एक असाल तर जरा थांबा आणि थोडा विचार करा. लॉकडाऊन कंटाळवाणा असला तरीही तो आता गरज बनला आहे. भारतामध्ये विस्कळीत आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी सरकारला अनलॉक जाहीर करणं क्रमप्राप्त आहे. पण या अनलॉकचा (Unlock) फायदा घेत नियम धाब्यावर बसवून बाहेर पडणं धोक्याचं आहे. अनलॉक जाहीर झाला असला तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे उद्यापासून होणारा फेस्टिव्ह सीझन (Festive Season)  कितीही हवाहवासा वाटत असला तरीही अनेक पारंपारिक गोष्टींना मुरड घालत आपल्याला यंदाचा नवरात्र, दिवाळीचा सण साजरा करणं आवश्यक आहे.

भारत हा जगात कोरोनाबाधित देशाच्या यादीमध्ये दुसर्‍या स्थानी आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर आहे. जर आगामी सणासुदीच्या काळात आपण काळजी घेतली नाही तर येत्या काही महिन्यात पुन्हा रूग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीती आहे. त्यामुळे आगामी फेस्टिव्ह सीझन साजरा करताना काही गोष्टींना मुरड घालत सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींबाबत दक्ष रहा.

गर्दीची ठिकाणं टाळा

नोवेल करोना वायरसचा फैलाव रोखायचा असेल तर गर्दी टाळणं हाच सध्या आपल्याकडे उपाय आहे. सणांमध्ये तुम्ही घराबाहेर पडून मित्रमंडळींना भेटता, नातेवाईकांच्या घरी फराळावर ताव मारता पण यंदा हे टाळावं लागेल. सणाच्या खरेदीसाठी देखील बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगला पसंती द्या. लोकांची खूप गर्दी असलेली ठिकाणं किंवा खरेदीची ती वेळ टाळा. खरेदीसाठी बाहेर पडायचे असेल तर कमी गर्दीच्या वेळेची निवड करा.

सोशल डिस्टंसिंगचा नियम

कोरोना व्हायरल हा श्वसनमार्गातील ड्रॉपलेटच्या संपर्कात आल्याने शरीरात प्रवेश करतोय असा प्राथमिक अंदाज असला तरीही आता तो एअरबॉर्न म्हणजेच हवेतूनदेखील पसरू शकतो असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे फ्लूची लक्षणं असणार्‍या, नसणार्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवा. बाहेर पडल्यावर सरकारने बजावलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या निअमांचं काटेकोरपणे पालन करा.COVID-19 च्या हवेतून संसर्ग होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर CDC कडून नियमावलीमध्ये बदल.

मास्क घाला

गणेशोत्सवापूर्वी नियंत्रणात आलेली कोरोना स्थिती पुन्हा बिघडण्यामागील एक कारण म्हणजे सरकारने लॉकडाऊन मधून दिलेली शिथिलता पाहून अनेकजण बेजबाबदारपणे बाहेर पडले. आजही सार्वजनिक ठिकाणी फिरताना नागरिक मास्क योग्य रित्या वापरत नाही. तो नाक आणि तोंडावर न ठेवता गळ्यात लटकवला जातो. हातात ठेवला जातो. किंवा मास्क काढून बोलण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे बाधित रूग्णाकडून कोरोना वायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो.

म्हणूनच कापडी 3 लेअर मास्क वापरा. ते स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता. तसेच किमान 30 वेळा धुतल्यानंतर किंवा 6 महिन्यांचा वापरानंतर जुना झालेला मास्क बदलणं गरजेचे आहे. Navratri 2020 Dates & Colours for Facemask: सुरक्षित शारदीय नवरात्रोत्सवासाठी यंदा पहा नवरात्रीच्या नऊ रंगांनुसार कोणत्या तारखेला कोणत्या रंगाचा मास्क वापराल?

घरातील सणांच्या प्रथा परंपरांंना बगल देण्यात चूक नाही

भारतीय सण, संस्कृती म्हटली की त्याच्यासोबत वर्षानुवर्षांच्या परंपरा आल्या. यंदा सण साजरे करताना जीव धोक्यात टाकून प्रथा-परंपरा जोपासणं शक्य असल्यास टाळा. दरवर्षी सणांच्या निमित्ताने तुम्ही देवळात जाऊन दर्शन घेण्याचा, एकत्र फॅमिली गेट टुगेदर करण्याचा हट्ट टाळा. सणांच्या निमित्ताने फराळ देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाणं टाळा. तसेच यंदा फराळही बेताने करा. अति तेलकट पदार्थ आरोग्याला हानिकारक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होईल अशा पदार्थांवर ताव मारणं टाळा. सणाच्या निमित्ताने सहाजिकच त्याची चव चाखणं यापासून जबरदस्तीने लांब राहू नका.

भेटवस्तूंची देवाण-घेवाण टाळा

नवरात्र, दिवाळी हा सण जल्लोषाचा असल्याने अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देतात, घेतात. मात्र यंदा या परंपरेमध्येही सुरक्षेची खबरदारी घेणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरसचा विषाणू विविध वस्तूंवर वेगवेगळ्या कालमर्यादेमध्ये राहू शकतो. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणं धोकादायक आहे. भेटवस्तू देण्यासाठी नातेवईकांकडे ये-जा करणं देखील जोखमीचं आहे. त्यामुळे हे टाळा आणि ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना गिफ्ट देऊन खूष करा. घरी आलेली प्रत्येक वस्तू नीट डिसइंफेक्ट करूनच उघडा आणि वापरा.

महाराष्ट्रात सणासुदीच्या काळातही अद्याप देवदर्शनासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. यंदा शक्य असल्यास सणासुदीमध्ये सेलिब्रेशनसाठी अनावश्यक वस्तूंवर खर्च होणारा पैसा कोविड 19 साठी काम करणार्‍या संस्थांसाठी वापरून समाजकार्याला मदत करण्याचा प्रयत्न करा. भारतामध्ये अद्यापही कोरोना फैलाव रोखण्यासाठी ठोस औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमावलीचं पालन करा.