बघता बघता यंदाचा दिवाळीचा (Diwali 2020) सण येऊन ठेपला आहे. गुरूवार 12 नोव्हेंबर दिवशी वसूबारस पासून पुढील 5 दिवस दिवाळीच्या सणाची धूम असेल. पण यंदा या सणावर कोरोनाचा संकट आहे. लॉकडाऊनमधून शिथिलता मिळत असली तरीही नागरिकांना मोकाटपणे बाहेर पडणं, दिवाळीत बेभान होऊन सण साजरा करणं मोठ्या धोक्यात घालू शकतं. त्यामुळे यंदा कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी साजरी करताना आपल्याला पर्यावरणाचं, एकमेकांच्या आरोग्याचं आणि त्यासोबतच एकमेकांच्या आर्थिक सबलीकरणाचं देखील भान ठेवणं गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वोकल फॉर लोकलचा' (Vocal For Local) नारा दिला आहे. त्यामुळे दिवाळी सण साजरा करताना त्याचं देखील भान ठेवल्यास तुमच्यासोबत तुम्ही इतर अनेक घरांमध्ये दिवाळीचा आनंद कळत-नकळतपणे पोहचवू शकता. Diwali 2020 Dates: यंदा दिवाळी कधी आहे? वसूबारस, लक्ष्मीपुजन ते भाऊबीज 6 दिवसांच्या दीपोत्सवात कोणता सण कधी?
वोकल फॉर लोकल आणि इको फ्रेंडली दिवाळी 2020 कशी साजरी करू शकाल?
शेणाच्या पणत्या, दिवे
दिवाळी हा दीपोत्सव असल्याने दिवे, पणत्या या सणाचा प्रमुख भाग आहे. यंदा दिवाळीच्या अनुषंगाने मातीच्या दिव्यांसोबतच शेण्याच्या पणत्या, दिवे बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही यंदा साधेपणाने दिवाळी साजरी करताना ग्रामीण भागात दिव्यांची निर्मिती करणार्या या समाजाकडून बनवलेल्या आकर्षक दिव्यांची खरेदी करून सण साजरा करू शकता. यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळेल सोबतच तुमचा सण देखील इको फ्रेंडली अंदाजात साजरा होऊ शकेल.
शेणापासून रांगोळी
तुम्हांला रांगोळी काढता येत नसेल तर आता शेणापासून रांगोळ्यांच्या काही तयार आकृती बनवून त्या सजवून रांगोळी थाटता येऊ शकते. शेणाच्या गोवर्यांवर टिकल्या आणि दिव्यांची आरास केलेली आहे. तसेच पावडर स्वरूपातील रांगोळ्यांमध्येही तुम्हांला ऑर्गॅनिक रंग वापरता येऊ शकतात.
खणाचे कंदील
कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकर्यांवर गंडांतर आलं पण यातून बाहेर पडून अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करताना कंदील बनवले आहेत. यामध्ये पारंपारिक कागदाच्या कंदीलापासून अगदी यंदा खणाचे कंदील उपलब्ध आहेत. थोड्या हटके आणि पारंपारिक अंदाजातील हे कंदील आकर्षणाचा भाग बनत आहे. त्याची ऑनलाईन विक्री देखील सुरू झाली आहे. खण हे महाराष्ट्राचं एक पारंपारिक वस्त्र प्रकारातील एक आहे.
ग्रीन क्रॅकर्स
महाराष्ट्रात सरकारने पूर्ण फटाक्यांवर बंदी घातलेली नाही. मुंबई वगळता अन्य ठिकाणी फटाके फोडताना पर्यावरणाचा विचार करून, धूर कमी होईल अशा फटाक्यांची निवड करा असं आवाहन केलं आहे. पर्यावरण फटाक्यांमध्ये तुम्ही ग्रीन क्रॅकर्सचा विचार करू शकता. यामध्ये धूर किंवा प्रदुषणकारी केमिकल्सचा समावेश नसतो. Firecrackers Ban in Mumbai: दिवाळी मध्ये यंदा लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी केवळ 2 तास फुलझडी, अनार उडवण्यास परवानगी; BMC ने जारी केली नियमावली.
खरेदी
Handicrafts Sector plays a remarkable & important role in the country’s economy. It gives employment to a huge segment of craft artisans in rural & semi-urban areas and produces considerable foreign exchange. This Diwali let us support this sector and go #Local4Diwali. @PMOIndia pic.twitter.com/5mEJ2yCd8T
— MyGovIndia (@mygovindia) November 9, 2020
दिवाळीच्या निमित्ताने कपडे, भेटवस्तू घेताना देखील भारतीय ब्रॅन्डचा विचार करा. सरकारकडून खादी, रेशमी वस्त्रांची विविध भंडारं, दुकानं खुली करण्यात आली आहेत.
दिवाळीचा सण हा आनंदाचा, सुख-समृद्धीचा आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने तुमच्या आजुबाजूच्या गरजवंताच्या घरातही या सणाच्या आनंदाचा प्रकाश पोहचेल याची काळजी घ्या.