Unlock 1: शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला; विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी NCRT कडून गाइडलाइन्स जारी
Representational Image (Photo Credits: PTI)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. परिणामी, देशातील, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून आता पुन्हा शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याच्या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारकडून पाऊल उचलली जात आहे. यातच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे? याबाबत पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाच्या काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वाहनांसारखाच आता वर्गात आणि विद्यार्थ्यांसाठी सम-विषमचा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

शाळा उघडल्यानंतर सम-विषम रोलनंबरच्या आधारे करण्यात येणार आहे. शाळा दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी वर्गानुसार 10-10 मिनिटांच्या अंतराने वेळा ठरवून दिल्या जातील. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे उल्लंघन होणार नाही. महत्वाचे म्हणजे, बंद खोलीत तास घेण्याऐवजी मोकळ्या जागेत किंवा मोकळ्या वर्गात शिकवण्यात यावी, अशी शिफारसही गाइडलाइन्समध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती दैनिक भास्करने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?

शाळा विशेष गाइडलाईन-

एका वर्गात 30 ते 35 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसण्यास परवानगी नाही. दोन विद्यार्थ्यांमध्ये 6 फूटांचे अंतर आणि सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. वर्गातील सर्व दारे-खिडक्या उघड्या असाव्यात. सम-विषम रोल नंबरनुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. विद्यार्थ्यांच्या जागा बदलू नयेत. रोज त्यांना गृहपाठ देणे आवश्यक आहे. शाळेत प्रवेश केल्यानंतर स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन सर्व प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. शाळेतील सर्व गोष्टी, खाण्याचे पदार्थ विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत घेऊन यावेत. कोणालाही शेअर करू नयेत.

पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता 11 वी आणि इयत्ता 12वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात 2 आठवड्यांनंतर इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येतील. 3 आठवड्यांनंतर चौथ्या टप्प्यात इयत्ता 3री ते इयत्ता 5वी वर्ग सुरू करण्यात येतील. पाचव्या टप्प्यात पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 5 आठवड्यांनंतर सहाव्या टप्प्यात नर्सरी आणि केजीचे वर्ग परवानगी मिळाल्यानंतर सुरू करण्यात येतील. रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील वर्गमात्र ग्रीन झोन होईपर्यंत बंद राहणार आहेत.