बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये निवडणुकीत सर्वात चांगला फायदा कोणाचा झाला असेल तर ते आहेत डावे पक्ष. होय, डाव्या पक्षांनी तब्बल 16 जागा जिंकल्या आहेत. सीपीआय (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (Marxist Communist Party, CPM) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माले-लिबरेशन) (Communist Party of India, Marxist–Leninist) अशी या पक्षांची नावे आहेत. या पक्षांनी 1995 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. या निवडणुकीत डाव्या पक्षांचा नेता कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) यांची जादू आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची खेळी डाव्या पक्षांसाठी कामी आल्याचे दिसते आहे.
बिहारमध्ये प्रामुख्याने तीन डावे पक्ष सक्रीय आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच सीपीआय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणजे सीपीएम आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माले-लिबरेशन) अशी या पक्षांची नावे आहेत. मगागठबंधनच्या जागावाटपात डाव्या पक्षांच्या वाट्याला 29 जागा आल्या. यातील 16 जागा जिंकण्यात डाव्या पक्षांना यश आले. (हेही वाचा, Chirag Paswan: चिराग पासवान यांनी काय कमावले? स्वत:ची नाव तर बुडवलीच, नीतीश कुमार यांच्याही जहाजाला तडे घालवले, भाजप हनुमानाला गिफ्ट देणार का?)
डाव्या पक्षांच्या जागा (पक्षनिहाय)
लढवललेल्या एकूण जागा- 29
जिंकलेल्या एकूण जागा- 16
सीपीआय- 2
सीपीएम- 2
कम्युनिस्ट पार्टी (माले-लिबरेशन)- 12
खूप वर्षांनी चांगली कामगिरी?
भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच सीपीआयने 1972 नंतर पहिल्यांदाच इतकी चांगली कामगिरी केली. 1972 मध्ये या पक्षाला येथे 35 जागा मिळाल्या होत्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच माकपला 2000 नंतर अशी कामगिरी करता आली. त्या वर्षी या पक्षाला 14 जागा मिळाल्या होत्या. भाकपा (माले-लिबरेशन) 1990 पासून बिहारमध्ये उमेदवार उतरवतो आहे. या वेळी या पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत. या आधी या पक्षाने सर्वाधिक 7 जागा 2015 मध्ये जिंकल्या होत्या.
कन्हैय्या कुमार यांची जादू, तेजस्वी यादव यांची खेळी
महागठबंधन मंधील प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रीय जनता दलाने या वेळी विशेष उदारता दाखवली. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने डाव्या पक्षांना 29 जागा सोडल्या. खरे तर 1990 नंतर लालू प्रसाद यादव यांच्यामुळेच बिहारमध्ये डावे पक्ष अडचणीत आले होते. डाव्या पक्षांचा जनाधार लालू प्रसाद यादव यांनी खेचला होता. परंतू, तेजस्वी यादव यांनी मात्र, या वेळी समन्वयाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला कन्हैय्या कुमार यांच्या रुपात डाव्या पक्षांना एक फर्डे वक्तृत्व असलेला नेता मिळाला आहे. त्यामुळे डाव्या पक्षांनी दाखवलेली एकजूट आणि कन्हैया कुमार यांचे वक्तृत्व असा संगम डाव्या पक्षांना आवाज देणारा ठरला. बिहारमध्ये डाव्या पक्षांची ताकद चांगलीच वाढली.
बिहार विधानसभा निवडणूक निकाल
एनडीए - 125 जागा (भाजप 74, जदयु 43, VIP 4, HAM 4)
महागठबंधन - 110 जागा (आरजेडी 75, काँग्रेस 19, डावे पक्ष 16)
अन्य - 8 जागा (AIMIM 5, BSP 1, LJP 1, अपक्ष 1)
दरम्यान, बिहार विधान सभा निवडणूक 2020 मध्ये अधिक जागा मिळाल्याने नीतीश कुमार यांच्या नेृत्वाखाली एनडीए सत्तास्थापन करत आहे. दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन विरोधी पक्षात बसण्याच्या पवित्र्यात आहे. बिहारमध्ये नीतीश कुमार यांच्या जदयु पक्षाची कामगिरी ठिकठाक तर भाजपची बरी म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव यांचीही कामगिरी चांगली झाली. मात्र, त्यांना सत्तेपर्यंत मात्र पोहोचता आले नाही. काँग्रेसची कामगिरी मात्र तुलनेत दुबळी राहील तर चिराग पासवान यांची कामगरी सुमार पेक्षाही अधिक वाईट राहिली.