Chirag Paswan: चिराग पासवान यांनी काय कमावले? स्वत:ची नाव तर बुडवलीच, नीतीश कुमार यांच्याही जहाजाला तडे घालवले, भाजप हनुमानाला गिफ्ट देणार का?
Chirag Paswan | (Photo Credits: Facebook)

बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2020 (Bihar Assembly Election Results 2020) नंतर सर्वाधिक चर्चेत आलेले व्यक्तिमत्व म्हणजे लोक जनशक्ती पार्टी (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan). सुरुवातीपासूनच संभ्रमीत राहिलेल्या चिराग पासवान यांनी या निवडणुकीत नेमके काय कमावले? हे या चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा. कारण या निवडणुकीत चिराग पासवान स्वत:तर बुडालेच. परंतू, नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचीही बोट त्यांनी धक्क्याला लावली. तीही पुरती तडे घालवून. त्यामुळे या सगळ्याच्या मुळाशी मुद्दा येतो तो चिराग पासवान असे का वागले? चिराग पासवान यांच्यामुळे जदयु (JDU) पक्षाच्या जागा घटल्या आणि भाजप (BJP) बिहारमध्ये अधिक शक्तिशाली झाला असे मानले जात आहे.

अपेक्षाभंग

लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक राम विलास पासवान यांच्या निधनानंतर मोठी जबाबदारी खांद्यावर आलेल्या चिराग पासवान यांना ही निवडणूक मोठी संधी होती. या निवडणुकीत लोकजनशक्ती पक्ष एकूण 137 जागांवर निवडणूक लढला. परंतू, या पक्षाला केवळ 1 जागा कशीबशी मिळाली. ऑक्टोबर 2000 नंतर या पक्षाची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. परंतू, चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, पराभव झाला असला तरी पक्ष मजबूत झाला आहे. पक्षाचा जनाधार (मतांची टक्केवारी) वाढली आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Elections 2020 Results: बिहार मध्ये NDA ला स्पष्ट बहुमत;RJD ठरला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष)

Chirag Paswan | (Photo Credits: Facebook)

भाजपची टीम 'B'

लोकजनशक्ती पार्टी ही भाजपची 'टीम बी' म्हणून काम करत आहे असा आरोप सुरुवातीपासूनच होत होता. अरथात चिराग पासवान यांनी हा आरोप नेहमीच फेटाळून लावला. परंतू, ते आपण नरेंद्र मोदी यांचा हनुमान असल्याचे नेहमीच सांगत आले आहेत. तसेच, चिराग यांनी जाहीरपणे सांगितले होते की, आपण भाजप विरोधात (एकादा अपवाद वगळता) उमेदवार उभे करणार नाही. आपण फक्त नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे करणार. त्यांनी तसे केलेही. परीणामी जदयु (JDU) मतविभागणी झाली. जदयू उमेदवार मोठ्या प्रमाणावर पराभूत झाले. नितीश कुमार याच्या पक्षाची ताकद घटली. त्यामुळे चिराग पासवान यांना अशी भूमिका घेण्यासाठी भाजपची फूस होती, हे आता स्पष्ट झाले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणूक निकाल

एनडीए - 125 जागा (भाजप 74, जदयु 43, VIP 4, HAM 4)

महागठबंधन - 110 जागा (आरजेडी 75, काँग्रेस 19, डावे पक्ष 16)

अन्य - 8 जागा (AIMIM 5, BSP 1, LJP 1, अपक्ष 1)

चिराग पासवान यांनी काय कमावले?

बिहारमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता स्थापनेपासूनच लोकजनशक्ती पक्षाचा नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षासोबत संघर्ष आहे. हा संघर्ष लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी तितका पाहायला मिळत नाही. त्यामुळे बिहारच्या राजकारणातून नीतीश कुमार यांचे वर्चस्व कमी करायचे हे या पक्षाचे धोरण दिसते. परंतू, हे धोरण अमलात आणताना चिराग पासवान स्वत: खणलेल्या खड्ड्यात स्वत:च पडल्याचे पाहायला मिळते. चिराग यांचे वडील राम विलास पासवान केंद्रात एनडीए सरकारमध्ये मंत्री होते. असे असताना ते बिहारमध्ये एनडीए विरोधात लढले. सहाजिकच भाजपच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नव्हते. त्यामुळे भाजपला फायदा होईल आणि नीतीश कुमार यांच्या पक्षाच्या जागा कमी होतील अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतू यात चिराग यांच्या पक्षाची पुरती लक्तरे निघाली. त्यांना केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे येणारा काळ हा चिराग पासवान यांच्यासाठी अत्यंत खडतर असणार आहे. त्यांना शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी चिराग यांनी शून्य कमावले असेच म्हणावे लागेल.

Chirag Paswan | (Photo Credits: Facebook)

भाजप 'हनुमान'ला बक्षीस देऊन पुनर्वसन करणार का?

चिराग पासवान यांच्या पक्षाला केवळ एक जागा मिळाली असली तरी नीतीश कुमार यांच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे त्यांच्या दावेदारीतला दम निघून गेला. परंतू चिराग पासवान राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला फेकले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी राम विलास पासवान यांच्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेवर घेऊन भाजप चिराग पासवान यांचे पूनर्वसन करणार का? हा खरा प्रश्न आहे. तसेही आपण नरेंद्र मोदी यांचे हनुमान आहोत असे चिराग पावसवान यांनी जाहीर सांगितलेच आहे. चिराग पासवान याना राज्यसभेवर घेतले तर भाजपलाही प्रतिमा संवर्धनाची संधी मिळणार आहे.

दरम्यान, चिराग पासवान यांच्या तुलनेत सर्वसाधारण त्यांच्याच वयाचे असलेले तेजस्वी यादव अधिक भाव घाऊन गेले. तेजस्वी यादव यांनी आपल्या स्वत: च्या हिमतीवर राष्ट्रीय जनता दलाला यश मिळवून दिले. आपला ठोस अजेंडा घेऊन ते जनतेसमोर गेले. जनतेनेही त्यांना स्वीकारले. केवळ मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची कामगिरी वाईट झाल्याने तेजस्वी यादव सत्तेपर्यंत पोहोचू शकले नाहीत.