Nitish Kumar and Tejashwi Yadav. (Photo Credits: PTI)

बिहार निवडणूकीच्या मतमोजणी (Bihar Vidhan Sabha Election Result)  आज (11 नोव्हेंबर) पहाटे अखेर संपली असून निकाल स्पष्ट झाला आहे. बिहारच्या मतदारांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर राजद हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. 243 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये सत्तास्थापनेसाठी 122 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे 124 जागा मिळवलेल्या एनडीएला (NDA)आता सत्तास्थपानेचा मार्ग मोकळा आहे. एनडीएमध्ये भाजपला (BJP) 74, जेडीयू (JDU) ला 43, मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला तगडी टक्कर देणार्‍या महागठबंधनला (Mahagathabandhan) 110 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये राजदने(RJD) बाजी मारत 75 जागा मिळवल्या आहेत तर कॉंग्रेसने (Congress) 19 आणि डाव्यांनी 16 जागांवर विजय मिळवला आहे. यासोबतच बिहारमध्ये ओवेसींच्या एमआयएमला 5, चिराग पासवासनच्या लोजद ला 1 आणि अपक्ष एका जागेवर निवडून आले आहेत. Bihar Election 2020 Results: नीतीश कुमार यांनी बिहारच्या CM पदाचा दावा सोडल्यास BJP मधील 'हे' नेते ठरू शकतात मुख्यमंत्री पदाचे दावेदार.

यंदा कोरोना वायरस संकटामुळे मतमोजणीची प्रक्रिया 18 तासांपेक्षाही जास्त काळ चालली. काल सकाळी 8 वाजता सुरू झालेली ही मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सकाळी 4 वाजेपर्यंत सुरूच होती. दरम्यान या मतमोजणीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढाई पहायला मिळत होती. त्यामध्येच महागठबंधनकडून त्यांच्या उमेदवारांना विजयी असूनही सर्टिफिकेट्स दिली जात नाहीत. पोलिंग बुथवर पोहचल्यावर पराभूत सांगून प्रवेश रोखला जातो अशा तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. रात्र उशिरा कॉंग्रेस आणि राजद चे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना भेटायला गेलं होतं.

दरम्यान रंगतदार झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये राजद ने चमकदार कामगिरी केली आहे. या निवडणूकीत लालू प्रसाद यादव यांचा लेक तेजस्वी यादव च्या कामगिरीकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. सत्तांतर करू शकले नसले तरी राजद सर्वाधिक जागा मिळवणारा बिहारमधील पक्ष ठरला आहे. लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणूकीत उतरलेल्या राजदने राजकीय विरोधकांना तगडी टक्कर दिल्याने त्यांचं कौतुक होत आहे.