
दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरण (Disha Salian Death Dase) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर या प्रकरणाचे जोरदार पडसात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधिमंडळ सभागृहात सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात आरोप झालेल्या शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना अटक करुन प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. 'पाठीमागील पाच वर्षांपासून या प्रकरणात आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्याला घाबरत नाही. प्रकरण कोर्टा आहे तर आम्ही त्याला कोर्टात उत्तर देऊ. जे बोलायचे ते कोर्टात बोलू', असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
'जे काही होईल ते कोर्टात'
आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी (20 मार्च) म्हटले की, 'गेल्या पाच वर्षांत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आम्ही आमची बाजू कोर्टात मांडू आणि आरोपांना कायदेशीररित्या उत्तर देऊ. मात्र, राज्य सरकार जनतेच्या मुद्द्यांवर बोलायला तयार नाही. औरंगजेब हा विषय अंगाशी आल्यानंर त्यांना पर्याय राहिला नाही. त्यामुळे त्यांनी जनतेचे लक्ष इतरत्र भटकविण्यासाठी इतर मुद्द्यांचा आधार घेतला असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला. (हेही वाचा, Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख; राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया, सत्ताधारी विरोधक आमनेसामने)
प्रकरणाची चौकशी नव्याने व्हावी: सतीश सालियन
दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी याचिकेत दाखल केलेले मुद्दे खालीलप्रमाणे:
- आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा
- तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करावा
- सतीश सालियन यांनी आरोप केला आहे की त्यांच्या मुलीवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली
- या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी राजकीय हेतूने हे प्रकरण लपविण्यात आले.
आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी
महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राणे यांनी मागील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारवर सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरेंना संरक्षणाची गरज का आहे? जर ते यात सहभागी नसतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे आणि त्यांचे नाव साफ करावे,असे राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी केलेले आरोप
- सीसीटीव्ही फुटेज हटवण्यात आले
- डॉक्टरांवर पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये बदल करण्यासाठी दबाव आणण्यात आला
- एमव्हीए सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला
- दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यू: कालमर्यादा
प्रकरणातील काही ठळक मुद्दे
- 8 जून 2020: मालाडमधील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यानंतर दिशा सालियन मृतावस्थेत आढळली.मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला.
- 14 जून 2020: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. सुरुवातीला आत्महत्या असल्याचे ठरवण्यात आले, नंतर पुढील तपासासाठी हा खटला सीबीआयकडे सोपवण्यात आला.
दरम्यान, शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी याचिकेच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राऊत यांनी राजकीय आकसातून हे प्रकरण पुन्हा उकरले जात असल्याचा आरोप केला आहे. तर राणे यांनी दाव्यांचे खंडन केले आणि म्हटले की दिशाचे वडील वर्षानुवर्षे दबावाखाली होते आणि आता न्याय मागत आहेत.