
दिल्लीतील आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आणि संयोजक आरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना एक मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या 13 नगरसेवकांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा (AAP Delhi Resignation) शनिवारी (17 मे) दिला आणि नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली. हे 13 नगरसेवक दिल्ली महानगरपालिकेतील (एमसीडी) माजी सभागृह नेते मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करत आहेत. त्यांनी तशी घोषणा केली आहे. जवळपास 25 वर्षांहून अधिक काळ नगरपरिषदेचा अनुभव असलेले अनुभवी राजकारणी मुकेश गोयल 2021 मध्ये काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर 'आप'मध्ये सामील झाले होते.
विकासनिधीती कमतरता आणि नाराजीनाट्यातून बंडखोरी
आम आदमी पक्षाचा राजीनामा दिलेल्या 13 नगरसेवकांनी विकासाचा अभाव, निधीची कमतरता ही कारणे असल्याचे कारण पुढे करत पक्ष सोडला आहे. वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना, प्रभाग 109 (विकास नगर) चे नगरसेवक अशोक पांडे यांनी सांगितले की, गटाचा निर्णय त्यांच्या संबंधित प्रभागांमध्ये विकासाचा अभाव आणि पक्षाकडून आर्थिक पाठिंब्याचा अभाव यामुळे झाला आहे. आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासासाठी काम करण्यासाठी येथे आलो होतो. काम होत नाही. आम्ही अडीच वर्षांपासून आम आदमी पक्षात होतो. आमची वसाहत अनधिकृत होती आणि लोकांना कचरा आणि ड्रेनेजशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आम्हाला पक्षाकडून काम करण्यासाठी निधी मिळाला नाही. आम्ही 'आप'च्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही कारवाई झाली नाही, असे पांडे म्हणाले.
बंडखोरांचा वरिष्ठांकडे अंगुलीनिर्देश
नगरसेवकांनी आरोप केला की, 'आप'मधील वरिष्ठ नेत्यांकडे या समस्या वारंवार मांडण्याचा प्रयत्न करूनही, कोणताही प्रतिसाद किंवा सुधारणात्मक कारवाई झाली नाही, ज्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी स्वतंत्र राजकीय संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, AAP MLAs Suspension: विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह 12 आप आमदारांचे निलंबन; दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांचा निर्णय)
राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची यादी:
- मुकेश गोयल
- हेमचंद गोयल
- दिनेश भारद्वाज
- हिमानी जैन
- उषा शर्मा
- साहिब कुमार
- राखी कुमार
- अशोक पांडे
- राजेश कुमार
- अनिल राणा
- देवेंद्र कुमार
आपली भूमिका व्यक्त करताना अशोक पांडे
VIDEO | Delhi: Several AAP councilors resign from party and announce a new party - ‘Indraprastha Vikas Party’.
Ashok Pandey, Ward 109, Vikas Nagar corporator who resigned from Aam Admi Party and joined ‘Indraprastha Vikas Party’ says, “We came here to work for development of our… pic.twitter.com/BCJavQkntv
— Press Trust of India (@PTI_News) May 17, 2025
दरम्यान, इंद्रप्रस्थ विकास पक्षाच्या स्थापनेमुळे 'आप'च्या एमसीडीमधील उपस्थिती आणि प्रभावावर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. दिल्लीच्या प्रशासकीय क्षेत्रात स्थानिक प्रशासन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, हा बदल वाढत्या अंतर्गत असंतोषाचे संकेत देतो आणि 'आप'च्या नेतृत्वासमोर एक नवीन आव्हान निर्माण करतो.