बिहार मध्ये आता निवडणूक आयोगाकडून 243 विधानसभा जागांसाठी कल जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान हे कल पाहता एक्झिट पोल खोटे ठरत महागठबंधन वर मात करून एनडीए 127 जागांवर आघाडीवर आहेत. कलांप्रमाणेच अंतिम निकालही असाच आल्यास भाजपाकडे घवघवीत यश असेल. त्यांचा मित्रपक्ष जेडीयू पेक्षा त्यांच्याकडे अधिक जागा असल्याने भाजपा मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असू शकतो? असे प्रश्न आता अनेकांच्या मनात डोकावू लागले आहेत. इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स .
इथे पहा बिहार निकाल विधानसभा मतदारसंघ निहाय
बिहार मध्ये आतापर्यंत जेडीयूचे नीतीश कुमार विरूद्ध आरजेडीचे तेजस्वी यादव असा मुकाबला सुरू होता. कदाचित तेजस्वी 31 व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात की काय? अशी चर्चा होती. मात्र आता चित्र पालटत आहे. निकाल पाहता भाजपच्या हातात सत्ता जाण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास पहा नीतिश कुमार यांच्यानंतर भाजपा आता त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करू शकतात?
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी भाजपा कुणाला देऊ शकतो संधी?
भाजपाकडून बिहारच्या सीएमपदी केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांची बढती होऊ शकते. दरम्यान त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान महागठबंधनला अनेक ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला होता. तेजस्वीच्या 10 लाख तरूणांना रोजगार देण्याच्या लोकप्रिय घोषणेचा समाचार घेत ते भ्रम निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
बिहारचे भाजपा पक्षाचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या गळ्यातही सीएम पदाची माळ पडू शकते. सुशील मोदी हे लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना बिहारच्या जनतेची आणि राजनैतिक खेळीची समज आहे.
केंद्रीय रवि शंकर प्रसाद यांची लोकप्रियता सर्वांनाच ठाऊक आहे. 2019 साली लोकसभा निवडणूकीमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे नीतीश कुमार नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.
सध्या केवळ कल जाहीर करण्यात आले आहेत. बिहारची स्थिती पाहता 50-60 जागा या संपूर्ण बिहारचं चित्र अजूनही पालटू शकतात. येथे अत्यंत चुरशीची लढाई सुरू आहे त्यामुळे निकालाचं चित्र हाती येण्यास अजून काही वेळ प्रतिक्षा करण्यातच शहाणपण आहे.