कर्नाटक राज्यात झिका विषाणू (Zika Virus) आढळून आला आहे. राज्यातील चिक्कबल्लापूर (Chikkaballapur district) जिल्ह्यात झिका विषाणू संक्रमित एका रुग्णाची पुष्टी झाली आहे. त्याची वैद्यकीय चाचणी केली असता तो पॉझिटीव्ह आढळला आहे. ज्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून दक्षता घेतली जात आहे. हा व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. राज्यात या विषाणूचा फैलाव झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आरोग्य विभागाने ऑगस्टमध्ये गोळा केलेल्या नमुन्यांच्या तपासणीनंतर चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील डासांमध्ये हा विषाणू आढळल्याचे पुढे आले. केरळमध्ये झिकाच्या प्रादुर्भावानंतर कर्नाटकात राज्यातही त्याचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने चिंता वाढली आहे.
चिक्कबल्लापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), एसएस महेश यांनी म्हटले आहे की,वराज्यभरात गोळा करण्यात आलेल्या एकूण 100 नमुन्यांपैकी सहा हे चिक्कबल्लापूरचे आहेत. यापैकी पाच नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर एका व्यक्तीला झिका व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, महेश यांनी म्हटले आहे की, ज्या व्यक्तींना सलग तीन दिवस सतत उच्च तापाचा सामना करावा लागत असेल त्यांनी. रक्ताचे नमुने तपासण्यासाठी देण्याची आवश्यकता आहे.
रुगण पॉझिटीव्ह आल्याच्या प्रकरणात एडीस डास व्हायरसचे मुख्य कारण असल्याचे आरोग्य अधिकार्यांना आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने एडीस डास आढळलेल्या जिल्ह्यातील गावाच्या 5 किलोमीटरच्या परिघात एक व्यापक सर्वेक्षण सुरू केले आहे. या सक्रिय पध्दतीचा उद्देश प्रदेशात झिका विषाणूचा संभाव्य प्रसार रोखणे आणि कमी करणे हे आहे. चिक्कबल्लापूरमध्ये झिकाच्या पुष्टीमुळे चिंता वाढली आहे . आरोग्य अधिकारी संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, रुग्णांचे वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, चिकबल्लापूर येथील डासांमध्ये झिका विषाणू आढळून आला आहे. आम्ही खबरदारीच्या उपाययोजना करत आहोत. अद्याप कोणत्याही व्यक्तीला या विषाणूची लागण झालेली नाही. आमचा विभाग याकडे लक्ष देत असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये.दरम्यान, आता या रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्याने वास्तव चित्र पुढे आले आहे.
झिका व्हायरस हा फ्लॅविविरिडे व्हायरस श्रेणीतील एक घटक आहे. त्याचे नाव युगांडाच्या झिका जंगलातून आले आहे. हा विषाणून 1947 मध्ये पहिल्यांदा वेगळा काढण्या आला होता. झिका विषाणू सामान्यत: सौम्य असतो. मात्र काही प्रकरणांमध्ये तो गंभीर ठरु शकतो. अशा वेळी रुग्णावर तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागतात.