भारतातील हवामान झिका व्हायरसच्या एडीस इजिप्टाय डासांच्या प्रादुर्भावासाठी पूरक असून, याच डासांच्या प्रजातींमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या रोगांची लागण होते. या रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लसीकरण उपलब्ध नसल्याने हे रोग जास्तच झपाट्याने फैलावतात.
राजस्थानमधील जयपूर शहरामध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना झिका व्हायरसची लागण झाली असून, आणखी अनेक रुग्ण या व्हायरसने ग्रासले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. झिका आणि डेंग्यूचे विषाणू एकच आहेत. त्यामुळे झिकाची लागण होणे सहजशक्य आहे.
लक्षणे -
जर एखाद्या व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली, तर त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो. तापाबरोबरच अंगावर पुरळही दिसून येते. तसेच डोकेदुखी, सांधेदुखी, आणि अंगदुखी सतावू लागते. क्वचित केसेस मध्ये रुग्णाच्या डोळ्यांमध्ये देखील संसर्ग होऊ शकतो.( conjunctivisis ). क्वचित प्रसंगी हा रोग प्राणघातकही ठरू शकतो.
उपाय -
> सर्वप्रथम आपण राहत असलेल्या परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव तर होत नाही ना याकडे लक्ष द्यावे.
> शरीरात ताप, डोकेदुखी अशी लक्षणे आढल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
> घराच्या आसपास साठलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होण्याची व्यवस्था करावी. हौदांमध्ये किंवा टाक्यांमध्ये साठविलेले पाणी झाकून ठेवले जाईल याची खबरदारी घ्यावी.
> घराच्या बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत. बाजारामध्ये अनेक तऱ्हेची डास प्रतिरोधक क्रीम्स, रोल-ऑन्स इत्यादी उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा.
> घराच्या आसपास डास येणार नाहीत अशी झाडे घरामध्ये आणि घराच्या आसपास लावावीत. (सिट्रोनेला, तुळस, लॅव्हेंडर इत्यादी )
> एडीस इजिप्टाय हा डास दिवसा चावणारा डास असल्याने घराच्या बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.