पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात 10 लाख रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर, रेल्वे भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये एक आशा निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर, रेल्वे मंत्रालयाने पुढील एका वर्षात 1 लाख 48 हजार 463 रिक्त पदांवर भरती करण्याची घोषणा केली आहे. यासह रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 8 वर्षांत रेल्वेने वार्षिक सरासरी 43 हजार 678 नोकऱ्या दिल्या आहेत.
रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख पदे मंजूर आहेत. मार्च 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले होते की, रेल्वेमध्ये एकूण 2 लाख 98 हजार 428 पदे रिक्त आहेत. रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले होते की, रेल्वेमध्ये एंट्री लेव्हल पदांव 1.49 लाख जागा रिक्त आहेत. झोननिहाय बोलायचे झाले तर उत्तर रेल्वेत सर्वाधिक 19183 पदे रिक्त आहेत.
मोदींच्या निर्देशानंतर विविध विभाग आणि मंत्रालयांना रिक्त पदांचा तपशील तयार करण्यास सांगण्यात आले आणि एकूण आढावा घेतल्यानंतर 10 लाख लोकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रेल्वे मंत्रालय 1 लाख 48 हजार 463 रिक्त पदे भरणार आहे. रेल्वेमध्ये अनुसूचित जातीची 4445, अनुसूचित जमातीची 4405 आणि ओबीसींची 5403 पदे रिक्त आहेत. (हेही वाचा: New Labour Laws लागू झाल्यास 1 जुलै पासून 4 दिवसांचा आठवडा ते टेक होम सॅलरीत घट होण्याची शक्यता)
दरम्यान, अहवालानुसार, 1 मार्च 2020 पर्यंत, केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या 31.91 लाख होती. या आकडेवारीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व विभागांमध्ये 40.78 लाख पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार सुमारे 21.75 टक्के पदे रिक्त आहेत. अहवालात असे नमूद केले आहे की, या कर्मचाऱ्यांचे 92 टक्के मनुष्यबळ हे पाच मुख्य मंत्रालये किंवा विभागांचे आहे. यामध्ये रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह, पोस्ट आणि महसूल यांचा समावेश आहे.