Amazon (PC - Pixabay)

No Water-Bathroom Breaks: हरियाणातील (Haryana) मानेसर (Manesar) येथील ॲमेझॉन (Amazon) वेअरहाऊसमधील कामगारांनी 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असतानाही, ब्रेक न घेता सतत काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला आहे. देश अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करत असताना, इथल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असलेल्या कामाच्या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मागित महिन्यात 16 मे रोजी, मानेसर गोदामातील कर्मचाऱ्यांवर वाढलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अथकपणे काम करण्यासाठी दबाव आणण्यात आला. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.

अहवालानुसार, व्यवस्थापकांनी कथितपणे कामगारांना लक्ष्य पूर्ण होईपर्यंत पाणी पिण्यासाठी विश्रांती किंवा वॉशरूम ब्रेक न घेण्याचे वचन देण्यास सांगितले. कामगारांना कामाच्या वेळेत लघवी करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यास भाग पाडण्यात आल्याचाही आरोप होत आहे.

एकीकडे ॲमेझॉन कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण यांना प्राधान्य देण्याचे दावे करत आहे, आणि दुसरीकडे कामाच्या ठिकाणी अपुऱ्या सुविधा असल्याचा आरोप कामगारांनी केला. त्यांच्यामते वेअरहाऊस पंखे आणि कूलरने सुसज्ज असताना, त्यांची परिणामकारकता कमी आहे. कार्यरत क्षेत्रे अनेकदा 30-35°C च्या दरम्यान तापमानापर्यंत पोहचते आणि अशा उकाड्यात काम करावे लागते.

कामगार साधारण 10-तासांच्या शिफ्टमध्ये सतत उभे राहून काम करतात. अशावेळी मागणी केलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांना विश्रांती न घेता काम करावे लागते. त्यात प्रचंड उष्णता, अशावेळी त्यांच्यावरील शारीरिक ताण मोठ्या प्रमाणात वाढतो. इतके सगळे करून ते दरमहा अवघे 10,000 रुपये कमावतात. यामध्ये महिला कामगारांना अतिरिक्त आव्हानांचा सामना करावा लागतो. महिला कर्मचाऱ्यांना अस्वच्छ स्वच्छतागृहांमध्ये विश्रांती घेण्याची सक्ती केली जाते. (हेही वाचा: Elon Musk Had Sex With SpaceX Employee: एलोन मस्क यांनी स्पेसएक्सच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत ठेवले लैंगिक संबंध, आपल्या मुलांना जन्म देण्यास टाकला दबाव; अहवालात धक्कादायक खुलासा)

गोदामाचे तापमान पुरेसे राखले जात नाही. परिणामी, लोडिंग आणि अनलोडिंग विभागातील कामगारांना असह्य तापमानात काम करण्यास भाग पाडले जाते. कर्मचारी उष्णतेमुळे बेशुद्ध झाल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. ट्रक लोडिंग आणि अनलोड करणाऱ्या कामगारांनाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही त्याचे निराकरण झाले नसल्याचे कामगार सांगतात.