महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) मतदानापूर्वी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्याशिवाय भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील हॉटेलमध्ये वाटण्यासाठी तावडे पाच कोटी घेऊन आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
राजन नाईक हे नालासोपारा विरारमधून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर बहुजन विकास आघाडीने क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. पैसे वाटल्याच्या आरोपांवर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा आपल्याविरुद्धचा कट असून निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
तावडे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा डाव आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी. मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. सीसीटीव्ही फुटेज काढून तपास करावा. विनोद तावडे पुढे म्हणाले, नालासोपाऱ्यातील आमदारांची बैठक सुरू होती. मतदानाच्या दिवसाची आदर्श आचारसंहिता, मतदान यंत्र कसे सील केले जाईल आणि काही आक्षेप असल्यास काय करावे, या बाबींची माहिती दिली जात होती. तेव्हा पक्षाचे (बहुजन विकास आघाडी) कार्यकर्ते अप्पा ठाकूर आणि क्षितिज यांना वाटले की, आपण पैसे वाटत आहोत. (हेही वाचा: विरारमध्ये राडा; विनोद तावडे यांना पैसे वाटताना घेरले; दोन डायऱ्याही सापडल्या; बविआ कार्यकर्त्यांकडून रंगेहात पकडल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल)
पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजप नेते विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण-
#WATCH | BJP National General Secretary Vinod Tawde says, "...a meeting of MLAs of Nalasopara was underway. The Model Code of Conduct for the day of voting, how will voting machines be sealed and how to go about if an objection has to be made...I went there to tell them about it.… https://t.co/kOupjvw0wE pic.twitter.com/3JFRdecQp1
— ANI (@ANI) November 19, 2024
तावडे म्हणाले, मी 40 वर्षांपासून पक्षात आहे. अप्पा ठाकूर आणि क्षितिज मला ओळखतात, संपूर्ण पक्ष मला ओळखतो. तरीही निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करावी. त्याचवेळी वसई-विराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला. आपल्याला काही डायऱ्या सापडल्याचे ते म्हणाले. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. विरोधक भाजपवर हल्लाबोल करत आहेत.