Vinod Tawde Cash For Votes | (Photo Credit- X)

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) विरार येथील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत (Cash For Votes) असताना रंगेहात पकडले गेल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणूक 2024 साठी होणाऱ्या मतदानास काहीच तास बाकी असताना हा धक्कादायक प्रकार विरार येथील विवंता हॉटेल येथे हा सगळा प्रकार घडला. हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aaghadi) पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरल्याचा धक्कादायक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ वृत्तवाहिण्यांनी प्रसारीत केला जात असून, लाईव्ह प्रक्षेपणामध्ये तावडे हताशपणे बसून राहिलेले आणि गर्दीला काही बोलताना दिसत आहे. या ठिकाणी पोलीसही आहेत. पोलिसांसमोरच हा राडा सुरु आहे.

'माझे चुकले, मला वाचवा', विनोद तावडे यांचा हितेंद्र ठाकूरांना फोन

बहुजन विकास आघाडी पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक प्रचार समाप्त झाला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कोणत्याही प्रकारे बैठक घेता येत नाही विनोद तावडे यांना माहिती आहे. असे असतानाही भाजपसारख्या जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणविणाऱ्या पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस विरारसारख्या ठिकाणी येऊन पैसे वाटतो, हे धक्कादायक आहे. मला विनोद तावडे यांचे 10 फोन आले आहेत. माझे चुकले, मी येथे अडकलो आहे. मला वाचवा. हवे तर माझा फोन तपासा, त्यांचा फोन तपासा, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. दरम्यान, तावडे मला वाचवा म्हणत आहेत पण त्यांच्या (भाजप) नेत्यांचेच मला फोन येत आहेत की, त्यांना चांगला धडा शिकवा, असेही ठाकूर म्हणाले.

बॅगमध्ये 5 कोटी? एक डायरी आणि काही नोंदी

विनोद तावडे जवळपास 5 कोटी रुपये घेऊन आले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे एक बॅग आणि डायरीही सापडली आहे. ज्यात कोणाला किती पैसे दिले याबाबत नोंदी आहेत, असा दावा बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला विनोद तावडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. विधानसभा निवडणुकीचे जे काही नियम असतात, ते नियम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. तेच मी सांगत होतो, असेही तावडे म्हणाले.

विरार येथील विवंता हॉटेलमधील राडा

दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. प्रचार संपला की, मतदारसंघात आलेल्या बाहेरील नेत्यांनी मतदानाच्या 48 तास आधी मतदारसंघ सोडायचे असतात. भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला ही साधी बाब माहिती नाही काय? ते सांगतात की आम्ही निवडणुकीचे नियम सांगतो आहोत. भाजपचे कार्यकर्ते इतके बेअक्कल आहेत का? असा संतप्त सवालही हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.