Amol Kirtikar and Ravindra Waikar (संग्रहित संपादित प्रतिमा)

Amol Kirtikar vs Ravindra Waikar: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल भाजपसाठी (BJP) सुखद राहिलेले नाहीत. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (UBT) मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर (एकनाथ शिंदे गट) अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांनी अत्यंत निकराच्या लढतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला आहे.

या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी उद्धव गटाने चालवली आहे. याबाबत अहवाल समोर आल्यानंतर आता मुंबई उत्तर पश्चिम जागेवरील मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पाडण्यात आल्याचे 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांननुसार दि 4 जून 2024 रोजी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची मोजणी ही विहित वेळेत म्हणजे सकाळी 8 वाजता सुरु करण्यात आली. ‘ईव्हीएम’ मशीनवरील मतमोजणी साडेआठ वाजता सुरु करण्यात आली. फेरीनिहाय मत मोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत उमेदवारांना मिळालेली मते मतमोजणी टेबलवर फॉर्म क्रमांक 17 C भाग 2 मध्ये भरून त्यावर मतमोजणी प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही फेरीत मतमोजणी प्रतिनिधींकडून कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक फेरीअखेर संबंधित फेरीत तसेच फेरीअखेर सर्व उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत जाहीर करण्यात येत होती. यानुसार 25 व्या फेरीची मतमोजणी जाहीर होत असताना टपाली मतपत्रिकांची मतमोजणी संपली, त्यामुळे पंचविसाव्या फेरीची तसेच पंचविसाव्या फेरी अखेरची मतमोजणी जाहीर झाल्यानंतर, टपाली मतपत्रिकांच्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये उमेदवार अमोल कीर्तीकर यांना 1501 तर उमेदवार रवींद्र वायकर यांना 1550 मते प्राप्त होती.

नियमाप्रमाणे टपाली मतपत्रिकांची संख्या ‘ईव्हीएम’ मतमोजणीच्या सर्व फेऱ्यानंतरची ज्यात बेरीज केली जाते. त्यामुळे 26 व्या फेरीतील मतदान यंत्रांची मतमोजणी संपल्यानंतर 26 व्या फेरीतील 26 व्या फेरीअखेर मतदान यंत्रांच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर असणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात उमेदवार अमोल कीर्तीकर हे 1 मतांनी आघाडीवर होते. नियमाप्रमाणे 26 व्या फेरीनंतर टपाली मतपत्रिकांची मतमोजणीची संख्या समाविष्ट करून उमेदवारनिहाय मते जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उमेदवार वायकर हे 48 मतांनी आघाडीवर होते.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतमोजणी अखेर जर आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक बाद टपाली मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल, तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतःहून सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत बाद टपाली मतपत्रिका पुन:र्परीक्षण करणे बंधनकारक असल्याने व 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात बाद टपाली मतपत्रिकांची संख्या 111 इतकी असल्याने, या सर्व बाद टपाली मतपत्रिकांचे पुनर्परीक्षण उमेदवारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. तपासणीअंती टपाली मतपत्रिकांच्या मोजणी संख्येत काहीही फरक पडला नाही. (हेही वाचा: New Government Formation: इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता मावळली; 'योग्य वेळी योग्य पावले उचलू', बैठकीनंतर Mallikarjun Kharge यांची माहिती)

यानंतर दोन्ही केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांनी आवश्यक असलेले प्राधिकार दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल तसेच विजयी उमेदवार 7.53 वा जाहीर केला व कीर्तीकर यांच्या प्रतिनिधींनी 08.06  वाजता पुनर्मतमोजणीचे लेखी पत्र सादर केले. त्यांनी घेतलेली हरकत ही विहित मुदतीनंतर होती तसेच त्यांनी कोणतीही मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती. तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया तसेच ‘व्हीव्हीपॅट’ मोजणी दरम्यान कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती असे 27- मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.