Bomb | | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

कारगिल युद्ध (Kargil War) म्हटले की डोळ्यासमोर येतो तो 1999 मध्ये (Kargil War 1999) भारत पाकिस्तान यांच्यात झालेला लष्करी संघर्ष. या युद्धाच्या जखमा हळूहळू भरत असल्या तरी वेदना अद्यापही कायम आहेत. लद्दाख येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे या वेदना पुन्हा एकदा नव्याने ताज्या झाल्या. लद्दाख येथील अॅस्ट्रो फुटबॉल मैदानाजवळ बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एक चिमूकला ठार तर दोन तरुण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिल युद्धावेळी निकामी न झालेला आणि आजवर न फुटलेल्या बॉम्बचा स्फोट (Unexploded Bomb Explosion) झाल्याने ही दुर्घटना घडली.

लद्दाख येथील अॅस्ट्रो फुटबॉल मैदानाजवळ कारगिल युद्धातील बॉम्बच्या स्फोटात मृत्यू आणि जखमी झालेल्यांची अली नकी, मुंताझीर मेहदी आणि बाकीर अशी नावे आहेत. हे सर्वजण पश्कुमच्या खारझोंग येथील रहिवासी असल्याचे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. एएनआयने आपल्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, ही मुले फुटबॉल मैदानाकडे जात असताना त्यांनी बॉम्बला नकळतपणे ठोकर मारली. ठोकर बसताच बॉम्बचा स्फोट जाला. स्फोटामुळे अली नकी आणि मुंतझीर मेहदी गंभीर जखमी झाले. त्यांना कुर्बथांग येथील नवीन जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, बाकीर याचा मृत्यू झाला. त्याला दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पश्कुमचे नगरसेवक काचो मोहम्मद फिरोज यांनी माहिती देताना सांगितले. (हेही वाचा, कारगिल विजय दिवसाबद्दल तुम्हाला किती माहीत आहे? MyGovIndia च्या या Quiz मधून तपासून पहा ज्ञान)

लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) बीडी मिश्रा म्हणाले की, जखमी मुलांपैकी एकाची प्रकृती स्थिर आहे, तर दुसऱ्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. यावेळी बीडी मिश्रा यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 4 लाख रुपये आणि जखमी मुलाला एक लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणाही केली. एएनआयशी बोलताना ते पुढे म्हणाले की, मला या घटनेने खूप दु:ख झाले आहे. दुर्दैवी आहे की एका मुलाचा मृत्यू झाला आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले. एका जखमी मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दुसऱ्याबाबत चिंता आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या पार्श्वभूमीवर सुरक्षा काहीशी अधिक वाढवली आहे. खास करुन मोकळी मैदाने, रहदारीचा भाग, ज्या ठिकाणी लहान मुले, तरुण खेळतात अथवा अधिक वावरतात. यात मैदाने, उद्याने, रिकामे भूखंड आणि मोडकळीस आलेल्या आणि जुन्या, पडक्या इमारती यांचा समावेश आहे.