भारतीय रेल्वेने (Indian Railway) वैयक्तिक डाक संदेशवाहकांद्वारे गोपनीय कागदपत्रे पाठविण्याच्या ब्रिटीश काळातील सुविधेला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जवळ पास 160 वर्ष जुनी सुविधा लॉक डाऊन (Lockdown) मुळे बंद होत आहे, मागील चार महिन्यात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी रेल्वे तर्फे Cost Cutting ला सुरुवात करण्यात आली आहे. याच अंतर्गत डाक मॅसेंजर (Dak Messenger) सुविधा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. यानंतर आता सर्व संदेश हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाठवले जावेत अशी सूचना करण्यात आली आहे. यापुढे आता सर्व फाईलचे काम डिजिटली व्हावे, अशी सूचनाही रेल्वेने केली आहे. सर्व पत्रव्यवहार सुरक्षित ई-मेलद्वारे केले पाहिजे आणि स्टेशनरी, आणि इतर वस्तूंचा वापर कमीतकमी 50 टक्क्यांनी कमी करण्यास सुद्धा सांगितले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आस्थापनाशी संबंधित खर्चावर अंकुश ठेवण्यासाठी आणि बचत करण्याच्या उद्देशाने, रेल्वे पीएसयू / रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमधील सर्व चर्चा नेहमीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाव्या आणि त्यानुसार वैयक्तिक मेसेंजर / डाक मेसेंजरची बुकिंग त्वरित थांबवावी, अशी मंडळाने सूचना केली आहे. यामुळे भत्ते, स्टेशनरी, फॅक्स इत्यादींमध्ये लक्षणीय बचत होईल अशी अपेक्षा आहे.
ही सुविधा नेमकी कशी काम करत होती हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत. या सुविधेचे नाव हे डाक मॅसेंजर असे होते. रेल्वे नेटवर्कच्या संवेदनशील कागदपत्रे - रेल्वे बोर्डापासून ते त्याच्या विविध विभागांपर्यंत, विभाग आणि विभागांकडे फायली फेरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाते. इंटरनेट किंवा ईमेल नसताना ब्रिटीशांनी ही सुविधा सुरु केली होती. आतापर्यंत कागदपत्री व्यवहार अधिक सुरक्षित मानला जात असल्याने भारत सरकारने सुद्धा ही सेवा सुरूच ठेवली होती.
रेल्वे मध्ये सध्या 5000 डाक मॅसेंजर आहेत. या सगळ्यांची पगाराची किंमत 10 कोटीच्या घरात आहे, आता ही सुविधा बंद केल्याने हा खर्च वाचवण्याचा रेल्वेचा उद्देश आहे मात्र यातून 5000 कुटुंबांचा रोजगार बंद होणार आहे.