Post COVID Indian Railway Coach ची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून झलक; तांब्याचा मुलामा असलेले हॅन्डल ते प्लाझ्मा एअर प्युरिफिकेशन असं असेल रेल्वेच्या डब्ब्यांचं नवं रूप
Post COVID Indian Railway Coach। Photo Credits: Twitter/ PiyushGoyal

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. दरम्यान पुढील काही काळ आपल्याला कोरोनासोबतच घालवावा लागणार आहे. मात्र त्याच्यामुळे जनजीवन थांबून राहू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. कोरोना संकटात सध्या देशाला जोडणारी रेल्वे ठप्प आहे. पण पुन्हा नव्याबे भारतीय रेल्वेसेवा सुरू करण्यापूर्वी प्रवाशांचा त्यामधील प्रवास कोविड फ्री असावा यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी Post COVID Indian Railway Coach ची झलक ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. यामध्ये नव्या रेल्वेमध्ये हॅन्डल्स, लॅचेस यांना तांब्याचा मुलामा असेल, कोच प्लाझ्मा एअर प्युरिफिकेशनयुक्त असेल तसेच पाण्याचे नळ, सोप डिस्पेन्सर देखील पायांनी चालवता येतील अशी सोय आता करण्याचं काम सुरू झालं आहे.

दरम्यान ट्वीटर अकाऊंटवरू देण्यात आलेल्या माहितीमध्ये कपूरथला रेलवे वर्कशॉपमध्ये तयार होत असलेल्या नव्या कोचची झलक त्यांनी दाखवली आहे. यामध्ये कॉपर म्हणजेच तांब्याचा वापर करण्यामागे कारण आहे की यावर कोरोना व्हायरस केवळ अवघे काही तास सक्रीय राहतो. तर रेल्वेच्या शौचालयामध्येही हाताचा संपर्क टाळण्यासाठी आता पायाच्या सहाय्याने संचलित होतील असे फ्लश असतील, दरवाज्याच्या खुंट्या देखील पायाच्या मदतीने चालवल्या जातील. वॉश बेसिन जवळचा नळदेखील पायाच्या मदतीने चालवला जाईल म्हणजे हाताचा संपर्क कमीत कमी येईल.

एसी कोचमध्ये हवा खेळती आणि निर्जंतुकीत करण्यासाठी प्लाझमा एअर इक्विप्मेंट्स लावले जातील. कोचमधील सोफा, खिडकी, वॉशबेसिनवर देखील टिटॅनम डाय ऑक्साईड कोटिंग असेल. हे मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पियुष गोयल यांचे ट्वीट  

दरम्यान मार्च महिन्यापासून कोरोनाची जशी दहशत पसरायला सुरूवात झाली तशी देशभर नियमित प्रवासी रेल्वे सेवा तात्काळ खंडीत करण्यात आली आहे. सध्या काही ठराविक मार्गावर रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवल्या जात आहे. मुंबईमध्येही प्रवासी लोकल सेवा, मेट्रो सेवा बंद आहे.