Hurun India's Self-Made Entrepreneurs: डीमार्ट (Dmart) नावाची किरकोळ स्टोअर चेन चालवणारे राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) हे ‘सेल्फ मेड’ अव्वल उद्योजकांच्या (Self-Made Entrepreneurs) यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, तर झोमॅटोचे सह-संस्थापक दीपंदर गोयल (Deepinder Goyal) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दमानी यांच्या प्रमुख व्यवसायात 44% ची प्रभावी वाढ झाली आहे. यासह कंपनीचे मूल्यांकन 3.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. नुकतेच हुरुन इंडियाने देशातील टॉप 200 सेल्फ-मेड उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली आहे. अहवालानुसार, या यादीत दीपिंदर गोयल यांच्यानंतर स्विगीचे श्रीहर्ष माजेती आणि नंदन रेड्डी तृतीय क्रमांकावर आहेत.
पुढे मेक माय ट्रिपचे दीप कालरा आणि राजेश मगोव या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप 99,300 कोटी रुपये आहे. मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूटचे अभय सोई, 96100 कोटी रुपयांच्या बाजारमुल्यासह या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. पॉलिसी बझारचे यशिश दहिया आणि आलोक बन्सल सहाव्या स्थानावर आहेत. ड्रीम 11 चे भावित सेठ आणि हर्ष जैन सातव्या स्थानावर, झेरोधाचे नितीन आणि निखिल कामत आठव्या स्थानावर, राझरपेचे हर्षिल माथूर आणि शशांक कुमार नवव्या स्थानावर आणि नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर दहाव्या स्थानावर आहेत.
यादीमधील 66 कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरू येथे आहेत. यानंतर मुंबई (36) आणि गुरुग्राम (31) यांचा क्रमांक लागतो. संस्थापकांबाबत बोलायचे झाले तर, बंगळुरू 98 नावांसह आघाडीवर आहे. यानंतर मुंबई (73) आणि दिल्ली (51) यांचा क्रमांक लागतो. या यादीत तरुण उद्योजकांचाही समावेश आहे. झेप्टोचा सह-संस्थापक, 22 वर्षीय आदित पालीचा आणि 21 वर्षीय कैवल्य वोहरा यांनी यादीत स्थान मिळवले आहे. कंपनीचे मूल्यांकन 259% च्या वाढीसह 41,800 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वोहरा हा या यादीतील सर्वात तरुण उद्योजक आहे. (हेही वाचा: India's Retail Inflation Rates: नोव्हेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाईत 5.48% पर्यंत घसरण)
भारतीय संस्थापक जगभर आपला ठसा उमटवत आहेत. यादीत समाविष्ट असलेल्या एक तृतीयांशपेक्षा जास्त कंपन्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. यामध्ये आघाडीवर आहे Oyo Rooms चा रितेश अग्रवाल, ज्याची कंपनी 80 देशांमध्ये पसरली आहे. या यादीत 19 महिलांचाही समावेश आहे. नायकाही फाल्गुनी नायर महिलांमध्ये आघाडीवर आहे. कंपनीच्या मूल्यांकनात 30% वाढ झाल्याने ती पहिल्या 10 मध्ये पोहोचली आहे. मामाअर्थची गझल अलघ ही सर्वात तरुण महिला उद्योजिका बनली आहे, जिच्या कंपनीचे मूल्यांकन 55% वाढले आहे.