कंपन्यांमध्ये कामाच्या जास्त दबावामुळे (High Work Pressure) कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत आहे. गेल्या काही दिवसांत कामाच्या ठिकाणी असलेल्या दबावामुळे कर्मचाऱ्यांनी जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता एचआर सेवा आणि वर्कफोर्स सोल्यूशन्स प्रदान करणारी कंपनी जीनियस कन्सल्टंट्सने (Genius Consultants) वर्क प्रेशरबाबत एक सर्वेक्षण केले होते, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 79 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की, त्यांची कंपनी मानसिक आरोग्य समस्या आणि कल्याणासाठी अधिक काही करू शकते, मात्र ते कमी पडत आहेत.
अहवालात असेही नमूद केले आहे की 66 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या कामाच्या रचनेमुळे जास्त दबाव किंवा ओझे वाटत आहे. त्यांचा विश्वास आहे की त्यांचे काम-जीवन संतुलन गंभीरपणे विस्कळीत होत आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, मानसिकदृष्ट्या सोमवारी कामावर परतण्याची तयारी असताना, 45 टक्क्यांहून अधिक कर्मचारी प्रत्येक रविवारी संध्याकाळी चिंता आणि अस्वस्थतेचा अनुभव घेतात. यामध्ये 13 टक्के लोकांच्या याविषयी संमिश्र भावना आहेत.
याव्यतिरिक्त, 78 टक्के लोकांनी नोंदवले की, कामाच्या ठिकाणी समवयस्कांचा दबाव आणि सहकर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापन आणि वागणुकीबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करणे खूप कठीण आहेत. याबाबत जीनियस कन्सल्टंट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आरपी यादव म्हणाले, ‘आपण हे ओळखले पाहिजे की कर्मचारी कल्याण ही प्रवृत्तीनाही, तर संघटनात्मक यशाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. डेटा दर्शवितो की, मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या कामाच्या वातावरणात चिंता आणि अस्वस्थतेने संघर्ष करत आहेत. (हेही वाचा: Jhansi Shocker: कामाचा ताण आणि टार्गेटसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये झाले धक्कादायक खुलासे)
अहवालानुसार, मानसिक आरोग्य आणि काम-जीवन संतुलनास प्राधान्य देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी कंपन्यांनी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे. हा अहवाल 5 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 दरम्यान विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 1,783 कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. देशातील कंपन्या कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलत आहेत. मात्र, बहुसंख्य कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की, कंपन्या त्यांचे एकंदर कल्याण सुधारण्यासाठी अधिक काही करू शकतात. मात्र, अद्यापही केवळ याचा पाठ पुरवठा होत आहे, ग्राउंड रिॲलिटी अजिबात बदललेली नाही. बहुतांश कंपन्यांचा भर नफा वाढवण्यावर असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य ढासळत आहे.