झाशीच्या (Jhansi) नवााबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात एका फायनान्स कंपनीच्या एरिया मॅनेजरने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून पाच पानी सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये त्याने कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. कंपनीचे टार्गेट पूर्ण न केल्याच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे नोटमधून समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये त्याने आपली व्यथा मांडली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, टार्गेट पूर्ण न झाल्याने कंपनीचे अधिकारी सतत शिवीगाळ करून त्रास देत होते, म्हणून आपण हे टोकाचे पाउल उचलत आहोत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
अहवालानुसार, तरुण सक्सेना हा नवााबादच्या गुमनावारा पिचोर येथे कुटुंबासह राहत होता. तो बजाज फायनान्स कंपनीत एरिया मॅनेजर या पदावर कार्यरत होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या खोलीत आत्महत्या केली. काही वेळाने ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी घाईघाईने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या माहितीवरून पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
माहितीनुसार तरुणवर ग्रामीण भागातील कर्जवसुलीची जबाबदारी होती. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली असल्याने शेतकरी ईएमआय जमा करण्यास विलंब करत होते. यामुळे तरुणचे टार्गेट पूर्ण झाले नाही. गेल्या आठवडाभरापासून तरुणवर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव होता. कंपनीचे अधिकारी त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही देत होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, यामुळे तो खूप तणावाखाली होता. शनिवारी रात्री त्याने जेवणही केले नाही. रविवारी सकाळी उठल्यानंतर तो कुटुंबीयांशी बोलला. यानंतर खोलीत गेला. काही वेळाने पत्नी मेधा खोलीत आली तेव्हा तो फासावर लटकलेला दिसला. (हेही वाचा: Nagpur Shocker: धक्कादायक! आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय तरुणाचा कार्यालयातील वॉशरूममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)
पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, याधी लखनऊमध्ये (Lucknow) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. एचडीएफसी बँकेत अतिरिक्त उप-उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या सदफ फातिमा यांचा येथे मृत्यू झाला. या मृत्यूलाही कामाचा ताण कारणीभूत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बँकेत काम करत असताना त्या खुर्चीवरून खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.