Jhansi Medical College Accident: उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात लागलेल्या आगीत किमान 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या काही तासांनंतर राज्य सरकारने शनिवारी मृतांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. उत्तर प्रदेश सरकारच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. या चौकशी समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे महासंचालक असतील. याशिवाय वैद्यकीय आरोग्य सेवा संचालक, वैद्यकीय आरोग्य सेवांचे अतिरिक्त संचालक आणि अग्निशमन महासंचालकांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी या समितीचे सदस्य असतील. (हेही वाचा - Jhansi Medical College Fire: झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडव; 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, 40 अर्भकांना वाचवण्यात यश )
ही समिती आगीचे प्राथमिक कारण, कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा त्रुटी शोधून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शिफारशी करेल. ही समिती स्थापन केल्यानंतर सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काय म्हणाले डीएम?
झाशीचे डीएम अविनाश कुमार यांनी सांगितले की, वॉर्डमध्ये एकूण 49 मुलांना दाखल करण्यात आले होते. यापैकी 38 मुले पूर्णपणे सुरक्षित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील मुलांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तर 3 मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. एक मुलगा अद्याप बेपत्ता आहे. लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक तपासात अंदाज आहे. मात्र, सविस्तर अहवाल आयुक्त आणि डीआयजी सादर करतील. त्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.