Former President Pranab Mukherjee Passes Away: माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात निधन
Former President Pranab Mukherjee | (Photo Credit: Twitter)

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ( Former President Pranab Mukherjee) यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. राजधानी दिल्ली येथील आर्मी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभीजित मुखर्जी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.  प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee Passes Away) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे 10 ऑगस्टच्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आर्मी रुग्णलयात (Army Hospital in Delhi) दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे त्यांच्यावर ब्रेन सर्जरी (Brain Surgery) करण्यात आली. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणीही पॉझिटीव्ह आली होती. याबाबतची माहिती प्रणव मुखर्जी यांनी स्वत:च ट्विटरद्वारे दिली होती. मेंदूवरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणि प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीमही तयार करण्यात आली होती.

संसदीय राजकारणाचा प्रणव मुखर्जी यांना प्रदीर्घ अनुभव होता. भारतीय राजकारणाची जाण आणि त्याबाबतचा त्यांचा आवाका थक्क करणारा होता. 11 डिसेंबर 1935 मध्ये पश्चिम बंगाल येथे जन्मलेल्या प्रणव मुखर्जी यांनी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता ते आमदार, खासदार, पक्षनेता, केंद्रीय मंत्री ते राष्ट्रपती अशा विविध पद आणि भूमिकांवर काम केले. प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 2009 ते 2012 या काळात ते केंद्रीय अर्थमंत्री राहिले. भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाची प्रचंड जाण असल्यामुळे काँग्रेस आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांना नेहमीच आदराचे स्थान राहिले. 26 जानेवारी 2019 मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. 2012 मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि पुरोगामी लोकशाही आघाडी (युपीए) कडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाह आघाडी (एनडीए) चे उमेदवार पी. ए. संगमा यांचा त्यांनी पराभव केला. उल्लेखनीय असे की या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएच्या विरोधात जात प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. 25 जुलाई 2012 या दिवशी त्यांनी देशाचे 13 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

प्रणव मुखर्जी यांनी काही काळ नोकरीही केली आहे. पोस्ट अॅण्ड टेलेग्राफ कार्यालयात ते क्लर्क होते. पुढे 1963 मध्ये ते विद्यानगर महाविद्यालया राज्यशास्त्राचे प्रोफेसर झाले. या काळात ते देशेर टाक या वृत्तपत्रसाठी पत्रारिताही करत. मुखर्जी यांनी 1969 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या तिकावर ते राज्यसभा खासदार म्हणून निवडूण गेले. पुढे सलग 4 वेळा ते काँग्रेसचे राज्यसभा खासदार राहिले. या काळात माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळकले जात. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्रीही होते. 1975 ते 77 या काळात देशात लागलेल्या अणिबाणीच्या काळात प्रणव मुखर्जी यांना गंभीर आरोपांना सामोरे जावे लागले. मात्र, पुढे इंदिरा गांधी यांची सत्ता येताच त्यांच्यावरील सर्व आरोपांतून त्यांची मुक्तता झाली. (हेही वाचा- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर; आर्मीच्या रुग्णालयात उपचार सुरू)

प्रणव मुखर्जी 1985 मध्ये पश्चिम बंगालच्या काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहिले. इंदिरा गांधी यांचे थोरले चिरंजीव संजय गांधी यांच्याशी प्रणव मुखर्जी यांचे विशेष जमले नाही. पुढे राजीव गांधी यांच्याशीही त्यांचे काही कारणावरुन बिनसले. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. मात्र, राजीव गांधी यांच्याशी झालेल्या मतबेदातून त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि “राष्ट्रीय समाजवादी कांग्रेस” हा पक्ष स्थापन केला. मात्र, 1989 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

प्रणव मुखर्जी हे आयुष्यभर पंतप्रधान पदाचे अघोषीत उमेदवार राहिले. पण, त्यांना ती संधी कधीच मिळाली नाही. देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदावर त्यांना समाधान मानावे लागले. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पाहिले गेले. मात्र, प्रत्यक्षात राजीव गांधी पंतप्रधान झाले. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय आयुष्यात माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंहरा यांचे मोठे योगदान राहिले. नरसिंह राव पंतप्रधान असताना अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम करण्याच संधी प्रणवदांना मिळाली.काही काळात त्यांना केंद्रीय कॅबिनेट आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारीही मिळाली.

प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल राज्यातील वीरभूमी जिल्ह्यातील किरनाहर शहराजवळील मिराती गांवात झाला. ब्राह्मण कुटुंबातील कामगा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी मुखर्जी यांच्या पोटी प्रणव मुखर्जी यांनी जन्म घेतला. प्रणव मुखर्जी यांचे वडील 1920 पासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच ते 1952 ते 1964 पर्यंत पश्चिम बंगाल विधान परिषदेचे सदस्य आणि विरभूमी जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यही होते.