देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची सोमवारी यशस्वीरीत्या ब्रेन सर्जरी पार पडली. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रणव मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आर्मीच्या आर अँड आर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यापूर्वी प्रणव मुखर्जी यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली होती. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संपर्कात असलेल्या लोकांना त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘रुग्णालयात इतर बाबतीत उपचार घेण्यासाठी गेलो असतान कोरोनाची चाचणी केली व ती सकारात्मक असल्याचे आढळले आहे. गेल्या एका आठवड्यात, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि स्वत: ला वेगळे ठेवावे.’
पीटीआय ट्वीट -
Former President Pranab Mukherjee is on ventilator support at Army's R&R hospital: Sources
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2020
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, 84 वर्षीय मुखर्जी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आज आरआर हॉस्पिटलमध्ये गेले होते. ते सुमारे 20 मिनिटे रुग्णालयात होते. यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशी बोलून, त्यांच्या कोविड-19 च्या स्थितीबाबत आढावा घेतला. राष्ट्रपतींनी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. (हेही वाचा: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण)
दरम्यान, या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यतिरिक्त आणखी तीन केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आणि संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांचा अहवाल शनिवारी सकारात्मक आला. त्यांच्या आधी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हेही कोविड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.