Budget Session 2022: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; आर्थिक पाहणी अहवाल आज, उद्या अर्थसंकल्प
India Parliament. File Image. (Photo Credits: ANI)

आज (31 जानेवारी) पासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरूवात होत आहे. यंदादेखील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दोन सत्रामध्ये अधिवेशन पार पडणार असून पहिलं सत्र 2 ते 11 फेब्रुवारी असणार आहे. तर दुसरं सत्र 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान होणार आहे. यामध्ये आज देशाचा आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey for the year 2021-2022) संसदेत मांडला जाईल. तर 1 फेब्रुवारी दिवशी सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Union Finance Minister Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या हाती काय येणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभा, राज्यसभा प्रत्येकी 5 तास काम करणार आहेत. यामध्ये राज्यसभा सकाळी 9-2 आणि लोकसभा दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत काम करणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल त्यामुळे आज आणि उद्या सभागृहामध्ये शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. हे देखील नक्की वाचा: Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट कव्हरेज कुठे, कधी आणि कसे पहावे? येथे पहा तारीख आणि वेळेसह संपूर्ण माहिती .

दरम्यान मागील 2 अधिवेशनाप्रमाणेच यंदाच्या सत्रामध्येही सभागृहामध्ये ‘पेगॅसस' हेरगिरी प्रकरण चर्चेमध्ये असणार आहे. ‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये राजकारणी, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, यांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही पुराव्यांच्या आधारे करण्यात आला आहे. यासोबतच यंदाच्या सत्रामध्ये शेतकर्‍यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, चीनी घुसखोरी या विषयांवरून विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात. ‘पेगॅसस' प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारकडून त्यावर चर्चेला टाळाटाळ होत होती.

2020  मध्ये कोविड 1 9 जागतिक महामारीला सुरूवात झाल्यानंतर आता हे सहावं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 2020 चे बजेट अधिवेशन कोविड च्या पार्श्वभूमीवर 8 सिटिंग्स तर 2021 चं 10 सिटिंग्स इतकं कमी करण्यात आले होते. येत्या काही दिवसात देशामध्ये 5 राज्यांत निवडणूका होणार आहेत. त्या धामधूमीमध्येच हेच अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील पार पडणार आहे.