Budget 2022: भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार, केंद्रीय अर्थसंकल्प हा एक दस्तऐवज आहे. जो त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचा तपशील देतो. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सादर केलेला हा 10वा आणि सीतारामन यांनी 2019 मध्ये अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सादर केलेला चौथा अर्थसंकल्प असेल.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहांना संबोधित करून त्याची सुरुवात करतील. सत्राचा पहिला भाग 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे. यानंतर दुसरा भाग 14 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला पहिल्या अधिवेशनातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. (वाचा - Budget Session 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यसभेत आचारसंहिता लागू, सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिल्या सूचना)
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 कुठे पाहायचा?
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 लोकसभा टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय डीडी न्यूजवर लाइव्ह देखील पाहता येईल. अर्थसंकल्प त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही लाइव्ह दाखवण्यात येईल.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे -
सरासरी, अर्थसंकल्पीय भाषणे 90 मिनिटांपासून 120 मिनिटांपर्यंत असतात. तथापि, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 मधील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण दिले, जे सुमारे 160 मिनिटे चालले. सीतारामन यांच्या आधीचे सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण जसवंत सिंग यांनी 2003 मध्ये दिले होते, जे 135 मिनिटांचे होते. सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम हिरुभाई एम पटेल यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1977 मध्ये फक्त 800 शब्द बोलले होते.