Fake Spices: बनावट मसाले तयार करण्यासाठी गाढवाची विष्ठा, अ‍ॅसिड, भूसा आणि अखाद्य रंगांचा वापर; Uttar Pradesh मधील धक्कादायक प्रकार, कारखाना सील
Spices | Representational Image (Photo Credits: Pexels)

आजकाल बाजारामधून आपण विकत घेत असलेल्या खाद्यपदार्थांमधील भेसळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशी भेसळ करणारे लोक जास्त पैसे मिळवण्याच्या लालची वृत्तीमुळे 'आरोग्य हीच संपत्ती' हा मंत्र विसरतात आणि त्यामुळे ही भेसळ हळूहळू लोकांमध्ये गंभीर आजार निर्माण करते. आता असेच लोकांच्या आरोग्याशी खेळून बनावट मसाले (Fake Spices) तयार करणाऱ्या कारखान्याचा ‘पर्दाफाश’ झाला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरस (Hathras) जिल्ह्यात हा मसाल्यांचा कारखाना कार्यरत होता. धक्कादायक बाब म्हणजे हे मसाले तयार करण्यासाठी गाढवाची विष्ठा, अॅसिडस्, भूसा आणि अखाद्य रंगांचा वापर केला जात होता.

हाथरस कोतवाली सदर परिसरातील नवीपुरात बनावट मसाले बनवण्याच्या कारखान्यावर संयुक्त दंडाधिकाऱ्यांनी एफडीए टीमसह रात्री उशिरा छापा टाकला. येथून मोठ्या प्रमाणात बनावट मसाले बनविण्याचा मालही जप्त करण्यात आला आहे. हे मसाले बनवून ते विविध कंपन्यांच्या रॅपर्समध्ये घालून बाजारात पुरवले जात होते. घटनास्थळावरून पोलिसांनी 300 किलो बनावट मसाले जप्त करून कारखाना सील केला आहे. हा कारखाना हिंदू युवा वाहिनीचे सह-विभागीय प्रभारी मालक अनूप वार्ष्णेय याचा असून त्याला अटक केली आहे.

मसाले तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चाचणीनंतर, कारखाना मालकाविरूद्ध अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. कारखाना चालकाला सध्या शांतता भंग केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे व तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

सह न्यायदंडाधिकारी प्रेम प्रकाश मीणा म्हणाले की, स्थानिक ब्रँडच्या नावाखाली 300 किलोग्रामपेक्षा जास्त बनावट मसाले जप्त करण्यात आले आहेत. छापेमारी दरम्यान बनावट मसाले तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी बरीच सामग्री जप्त केली गेली आहे, ज्यात गाढवाचे शेण, भूसा, अखाद्य रंग आणि अ‍ॅसिडने भरलेले ड्रम्स यांचा समावेश आहे. धणे, हळद, लाल मिरची, गरम मसाला इत्यादी बनावट मसालेही इथे आढळले. (हेही वाचा: Odisha: चहा विक्रेत्याला 100 कोटींपेक्षा जास्त GST फसवणुकीसाठी नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण)

दरम्यान, अनूप चालवत असलेल्या ठिकाणी कारखाना चालविण्यास परवानगी नाही. अनुप याबाबतचा परवाना मिळविण्याचा प्रयत्न करीत होता परंतु प्रशासनाने त्याला मानकांचे पालन न केल्याने परवाना दिलेला नव्हता. अनूप ज्या ब्रँडच्या नावाखाली मसाले पॅक करून विकत होता त्या ब्रँडसाठी त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. आता तो कोणकोणत्या शहरात या मसाल्याच्या ब्रँडचा पुरवठा करीत होता याचा तपास केला जात आहे.