Hathras Stampede: जाणून घ्या कोण आहेत भोले बाबा, ज्यांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांनी गमावला आपला जीव
भोले बाबा (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras) आज एक मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी सत्संग सुरू असताना चेंगराचेंगरी झाली व त्यामध्ये जवळजवळ 100 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. हाथरस येथील सिकंदरराव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलराई गावात आयोजित नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबांच्या (Vishwa Hari Bhole Baba) म्हणजेच सूरज पाल यांच्या सत्संगात हा अपघात घडला आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतांचे आणि जखमींचे हे आकडे आणखी वाढू शकतात. या घटनेनंतर हे भोले बाबा नक्की कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घ्या या बाबांबद्दल काही खास माहिती.

तर अहवालानुसार, संत भोले बाबा हे मूळचे कांशीराम नगर (कासगंज) येथील पटियाली गावचे रहिवासी आहेत. आधी ते उत्तर प्रदेश पोलिसात भरती झाले होते, मात्र 17 वर्षांपूर्वी त्यांनी व्हीआरएस घेतली. त्यांनी सांगितले होते की, ते त्यांच्याच गावात एका झोपडीत राहतात आणि लोकांना देवाच्या भक्तीचा धडा शिकवण्यासाठी उत्तर प्रदेश व जवळपासच्या राज्यांमध्ये भ्रमंती करतात.

संत भोले बाबांच्या मते त्यांना कोणीही गुरू नाही. त्यांचे देवावर खूप प्रेम आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी त्यांचे आयुष्य मानव कल्याणासाठी वाहून घेतल्याचे ते सांगतात. संत भोले बाबांचे लाखो अनुयायी आहेत. दोन वर्षांपूर्वीही देशात कोरोनाची लाट सुरू असताना मे 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे त्यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने केवळ 50 जणांनाच सत्संगासाठी परवानगी दिली होती, मात्र कायद्याला बगल देत 50 हजारांहून अधिक लोकांनी सत्संगाला हजेरी लावली. याठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. (हेही वाचा: Court Sentences Father To 101 Years In Jail: केरळमध्ये वडिलांचा पोटच्या मुलीवर 6 वर्षे बलात्कार; मुलगी गरोदर, कोर्टाने आरोपीला सुनावली 101 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)

भोलेबाबा दर मंगळवारी त्यांचा 'सत्संग' घेत असत. हाथरसच्या आधी गेल्या आठवड्यात त्यांनी मैनपुरी जिल्ह्यात असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता. आता आज मानव मंगल मिलन समागम समितीने हाथरसमधील मुगलगढी भागात असलेल्या फुलराई गावात भोले बाबा यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 50 हजारांहून अधिक लोकांची गर्दी जमली होती. प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त लोक कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.