गेल्या वर्षी कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे देशात अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या. असे असूनही भारतीय श्रीमंतांची संपत्ती दुप्पट होत होती. गेल्या वर्षी देशात 40 नवे अब्जाधीश झाले आणि यासह एकूण अब्जाधीशांची संख्या 142 वर गेली. परंतु दुसरीकडे सुमारे 84% भारतीय कुटुंबांचे उत्पन्न घटले. ऑक्सफॅमने हा अहवाल (Oxfam Report) प्रसिद्ध केला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे भारतातील परिस्थिती अत्यंत बिकट होती. रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांनी भरलेली होती. स्मशानभूमीसमोर मृतदेहांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे अर्थव्यवस्थेचा विकास दर एका तिमाहीत -24 टक्क्यांच्या विक्रमाने नकारात्मक झाला होता. मात्र भारतामधील श्रीमंत हे अजून श्रीमंत होत होते.
ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे की, साथीच्या रोगाच्या सुरूवातीस 84% कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली होती आणि भारत उप-सहारा आफ्रिकेच्या रांगेत उभा होता, जिथे गरिबीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्गने ऑक्सफॅमचा हवाला देत अहवाल दिला की, 2020 मध्ये भारतातील गरीबांची संख्या दुप्पट होऊन 134 दशलक्ष झाली आहे, जी प्यू रिसर्चच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. ऑक्सफॅमने अधिकृत गुन्ह्यांच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी, स्वयंरोजगार आणि बेरोजगारांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत.
देशात आर्थिक विषमता किती प्रमाणात वाढली आहे, हे यावरून लक्षात येते की, भारतातील या काही अब्जाधीशांकडे देशाच्या 40 टक्के गरीब लोकसंख्येइतकी संपत्ती आहे. या 142 श्रीमंतांकडे 720 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. गेल्या मे महिन्यात शहरी बेरोजगारी 15% पर्यंत वाढली. संपत्तीच्या पुनर्वितरणासाठी सरकारने आपल्या धोरणांचा फेरविचार करावा, असे या अहवालात म्हटले आहे. म्हणजेच जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोरोनामुळे नाही तर सरकारी धोरणांमुळे निर्माण झाली आहे हे स्पष्ट आहे.
या अहवालात महामारीच्या काळात जागतिक स्तरावर संपत्ती कशी वाढली आहे याबद्दलही सांगितले आहे. ऑक्सफॅमने म्हटले आहे की, स्टॉकच्या किमतींपासून ते क्रिप्टोकरन्सी आणि इतर वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींचे मूल्य वाढले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, जगातील 500 सर्वात श्रीमंत लोकांनी गेल्या वर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये $1 ट्रिलियनपेक्षा अधिकची भर घातली. ऑक्सफॅमने म्हटले आहे की, भारतात आता फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झर्लंडपेक्षा अधिक अब्जाधीश आहेत. (हेही वाचा: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये Specialist Officer ची नोकरभरती; 4 फेब्रुवारी पर्यंत करा rbi.org.in वर अर्ज)
ऑक्सफॅमने शिफारस केली आहे की, सरकारने आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात श्रीमंत 10% लोकांवर 1% अधिभार लावावा. भारतातील 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांचा वाटा 25 वर्षांहून अधिक काळ देशभरातील मुलांच्या शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी पुरेसा असेल. या अहवालात लीक झालेल्या पेंडोरा पेपर्सचाही उल्लेख करण्यात आला असू,न अहवालात असे आढळून आले आहे की 380 हून अधिक भारतीयांकडे 200 अब्ज रुपयांची अघोषित विदेशी आणि देशांतर्गत मालमत्ता आहे.