Diwali 2022 Bumper Sale: दिवाळीच्या दोन दिवसांत तब्बल 25 हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री; 20 हजार कोटींची वाहने आणि इतर वस्तू विकल्या
Diwali 2022 Bumper Sale (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना विषाणू महामारीच्या दोन वर्षानंतर यंदा मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी (Diwali 2022) साजरी होत आहे. देशभरात या सणाचा उत्साह दिसून येत आहे. यंदा धनत्रयोदशीच्या (Dhanatrayodashi) दोन दिवसांत देशभरातील लोकांनी 45 हजार कोटींहून अधिक रुपयांची खरेदी केली आहे. यामध्ये दागिन्यांचा व्यवसाय सुमारे 25 हजार कोटींचा झाला, तर उर्वरित 20 हजार कोटींमध्ये ऑटोमोबाईल्स, संगणक आणि संगणकाशी संबंधित वस्तू, फर्निचर, भांडी, मोबाईल, कपडे इत्यादींची विक्री झाली आहे.

त्यानंतर आता सोमवारी लक्ष्मीपूजा आणि त्यानंतर बुधवारी भाऊबीज असल्याने, या दिवसांतही चांगली विक्री अपेक्षित आहे. वर्षभरामधील साधारणपणे 35-40 टक्के ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री सणांच्या कालावधीमध्ये होते. याआधी 2020 आणि 2021 हे वर्ष कोरोनाच्या छायेत गेल्यानंतर, यंदा लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.

विक्रीचे प्रारंभिक आकडे देताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी दिसून आली. यंदा सणासुदीच्या दिवसातील विक्रीचा आकडा 1 लाख 50 हजार कोटींच्या पुढे जाईल, असा कॅटचा अंदाज आहे. खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी दिवाळीशी संबंधित वस्तूंच्या विक्रीत चीनला 75 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होणार आहे.

दोन दिवसीय धनत्रयोदशीच्या सणामुळे देशभरात सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने, नाणी, मूर्तींची विक्री झाली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शनिवारी दिल्लीत सोन्याचा भाव 50,140 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव सुमारे 47,750 रुपये होता. CAIT आणि AIJGF च्या मते, करवा चौथच्या दिवशी (13 ऑक्टोबर) सुमारे 3,000 कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली. 2021 मध्ये 2,200 कोटी रुपयांची विक्री झाली होती. (हेही वाचा: दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; दिल्ली-मुंबईसह इतर शहरांमध्ये काय आहेत किंमत? जाणून घ्या)

सणासुदीच्या काळात टीव्ही, गृहोपयोगी वस्तू, FMCG आणि कपड्यांची ऑफलाइन आणि ऑनलाइन विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत व्हॉल्यूमच्या दृष्टीने 8-10 टक्क्यांनी जास्त असेल. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचा दावा आहे की सप्टेंबरच्या अखेरीस आठ दिवसांच्या बिग बिलियन डेज इव्हेंटमध्ये 100 कोटींहून अधिक ग्राहकांनी प्लॅटफॉर्मला भेट दिली. यामध्ये 60% पेक्षा जास्त ग्राहक टियर-2 आणि टियर-3 शहरांतील होते. लहान शहरांमधून फॅशन आणि लाइफस्टाइल वस्तूंची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 45% जास्त होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि मोठ्या उपकरणांची मागणी 20% ने जास्त होती. प्रीमियम फोनच्या खरेदीदारांपैकी 44% टियर-2 आणि टियर-3 शहरांतील होते.