Delhi-Mumbai Expressway (संग्रहित संपादित प्रतिमा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा (Delhi-Mumbai Expressway) पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित केला. राजस्थानमधील दौसा येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी रिमोट दाबून 18,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली-दौसा-लालसोटपर्यंत द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला आहे, जो 247 किलोमीटर लांब आहे.

हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यामुळे दिल्ली ते जयपूर हा प्रवास दोन तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येईल. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी पाच तास लागत होते. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) माहिती दिली की, 12,150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा पहिला भाग पूर्ण झाला आहे.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग 1,386 किमी लांबीचा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर 1,424 किमीवरून 1,242 किमीपर्यंत म्हणजेच 12 टक्क्यांनी कमी होईल. या महामार्गामुळे दोन महानगरांमधील प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होईल. दिल्ली ते मुंबई या प्रवासासाठी सध्या 24 तास लागतात, परंतु हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी सुमारे 12 तास लागतील.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल आणि कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडेल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आज मध्यरात्रीपासून या महामार्गावर ट्रोल चार्जिंग सुरू होईल. एनएचएआयने टोल प्लाझावरील वेगवेगळ्या वाहनांनुसार शुल्काची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली-जयपूर मार्गासाठी खासगी कारसाठी एकेरी टोल 500 रुपये असेल. नवीन द्रुतगती मार्गावरील टोल दर प्रति किलोमीटरच्या आधारावर आकारले जातील.  हरियाणा आणि राजस्थानमधील कर तिथल्या इतर टोल प्लाझांप्रमाणेच असतील. साधारण 19.8 किलोमीटरच्या प्रवासासाठी जास्तीत जास्त 90 रुपये आकारले जातील. एनएचएआय अधिकार्‍यांनी सांगितले की, अंतर तसेच विशिष्ट भागावरील बांधकामाच्या प्रकारानुसार जास्तीत जास्त कर आकारला जातो. मार्गात कोणत्याही प्रकारचा पूल असल्यास शुल्क वाढविण्यात येईल. (हेही वाचा: IGI Airport वर पुन्हा एकदा निष्काळजीपणा! 5 तास अडकले भुकेने आणि तहानलेले 200 प्रवासी)

द्रुतगती मार्गाच्या बाजूने बांधलेल्या बहुतांश सुविधा कार्यान्वित झाल्या आहेत. इंधन केंद्रेही कार्यान्वित झाली आहेत. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर कारसारख्या हलक्या वाहनांसाठी ताशी 120 किलोमीटरची कमाल वेग मर्यादा असेल. मात्र, अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा थोडी कमी असेल.