Cambodia Cyber Slaves: तस्करी रॅकेटद्वारे सायबर फसवणूक प्रकरणात अडकलेल्या 60 भारतीयांची सुटका
Anwarul Azim Anar | (Photo Credit -X, @indembcam)

Cambodia Trafficking Racke: तस्करीच्या रॅकेटद्वारे सायबर फसवणूक (International Cyber Fraud) कार्यात गुंतवलेल्या 60 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना नोकरी, व्यवसाय अथवा भरघोस आर्थिक मोबदला आदी आमिष दाखवत फसवणूक करून कंबोडियात (Cambodia) नेण्यात आले होते. तेथे त्यांच्याकडून विविध प्रकारचे सायबर क्राईम (Cyber Crime) करवून घेतले जात असे. काही लोकांनी तर या प्रकरणाची सायबर गुलाम (Cambodia Cyber Slaves) अशी संभावना केली आहे. या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी उच्चस्तरावरुन प्रयत्न केले. कंबोडियातील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, ते सुटका केलेल्या व्यक्तींना परत आणण्यासाठी कंबोडियन अधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत आहेत.

मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात

कंबोडियातील अंदाजे 150 भारतीयांनी त्यांच्या हँडलरकडून त्यांचे पासपोर्ट परत करण्याची मागणी केली आहे. तसेच या नागरिकांनी मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात माहितील्याची माहिती आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, या व्यक्ती, प्रामुख्याने विशाखापट्टणम आणि आजूबाजूच्या भागातील आहेत. ज्या कंबोडियामध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ अडकून आहेत आणि त्यांना सायबर गुन्हे आणि पॉन्झी योजना राबविण्यास भाग पाडले गेले आहे. त्यांना सुरुवातीला खोट्या नोकरीच्या ऑफरचे आमिष दाखवण्यात आले, जसे की सिंगापूरमधील डेटा एंट्री पोझिशन्स. यातील बहुतेकांना फक्त कंबोडियाला नेण्यासाठी आणि चिनी हँडलर्सकडून  सायबर घोटाळा  करण्यास भाग पाडले गेले. (हेही वाचा, Cambodia Cyber Slaves: नोकरी, पैसा याच्या नावाखाली ऑनलाईन क्राईम; कंबोडियामध्ये हजारो नागरिक बंदीवान; बनवले सायबर गुलाम)

सुमारे 5,000 भारतीय "अमानवीय" परिस्थितीत अडकले

विशाखापट्टणमचे पोलिस आयुक्त रविशंकर अय्यानार यांनी खुलासा केला आहे की कंबोडियामध्ये सध्या सुमारे 5,000 भारतीय "अमानवीय" परिस्थितीत अडकले आहेत. "हे खूपच चिंताजनक आहे की 5,000 भारतीय गेल्या दोन वर्षांपासून अमानवी परिस्थितीत तिथे काम करत आहेत. जर त्यांची कामगिरी त्यांच्या हँडलर्सच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल, तर ते अनेक दिवस त्यांना उपाशी ठेवले जाते. या सर्व प्रकाराला कंटाळून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या काही पीडितांनी याबाबात माहिती दिली. Govt Advisory On Job Fraud: सावधान! कंबोडियामध्ये नोकरीच्या अमिषाला बळी पडू नका, होऊ शकते मोठी फसवणूक; परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

नोकरीच्या शोधात असलेले तरुण गळाला

भारतामध्ये अनेक एजंट आणि संस्थांच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या तरुणांना हेरले जाते. त्यांना विदेशात भरघोस पगाराचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर त्यांची अधिकृतरित्या कोठेही नोंदणी नसलेल्या एजंटांद्वारे भरती केली जाते आणि नंतर बँकॉक किंवा सिंगापूरमार्गे त्यांना कंबोडियाला पाठवले जाते, असे आयुक्त अय्यानार यांनी स्पष्ट केले. "बँकॉक किंवा सिंगापूरच्या विमानतळावर, कंबोडियन एजंट या तरुणांना ताब्यात घेतात. हे तरुण अक्षरशः विकले जातात आणि त्या भारतीय एजंटांना पैसे मिळतात,"असेही अय्यानार म्हणाले.

सायबर गुन्हेगारीचे सखोल प्रशिक्षण

भारतातून कंबोडियामध्ये नेलेल्या व्यक्तींना पोइपेट येथे नेले जाते. हे एक थायलंड-कंबोडिया सीमेवरील शहर आहे. जेथे चिनी हँडलर्सद्वारे नियंत्रित एक विशेष आर्थिक क्षेत्र आहे. तेथे, त्यांना विविध सायबर फसवणूक तंत्रांचे, एक ते दोन आठवड्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये FedEx कुरिअर घोटाळे, बनावट शेअर बाजारातील गुंतवणूक, टास्क गेम्स, क्रिप्टोकरन्सी फसवणूक आणि हनी ट्रॅप यांचा समावेश आहे.

एक्स पोस्ट

विशाखापट्टणम पोलिसांनी 18 मे रोजी भारतीयांना कंबोडियाला पाठवण्यात सहभाग म्हणून मानवी तस्करीच्या आरोपाखाली तीन व्यक्तींना अटक केली. त्यांची नावे चुक्का राजेश, एस कोंडला राव आणि एम ज्ञानेश्वर राव अशी आहेत. त्यांच्यावर मानवी तस्करीचा आरोप आहे. भारतीय तरुणांचे फसवणुकीचे प्रमाण आश्चर्यकारक आहे. या सायबर घोटाळ्यांद्वारे भारतीयांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. एकट्या विशाखापट्टणममध्ये, सायबर फसवणुकीचे प्रसिद्ध ठिकाण, गेल्या 12 ते 18 महिन्यांत रहिवाशांचे अंदाजे ₹120 कोटींचे नुकसान झाले आहे.