धक्कादायक! प्रदूषणामुळे गंगा पठारावर राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान 7 वर्षांनी घटले
वायू प्रदूषण (फोटो सौजन्य- Pixabay)

सध्या भारतामध्ये वायू प्रदूषणाची (Pollutionसमस्या भेडसावत आहे. याचा सर्वात जास्त फटका गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना बसत आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने (Energy Policy Institute) काढलेल्या निष्कर्षानुसार, गंगेच्या पठारावर राहणाऱ्या भारतीयांचे आयुर्मान 7 वर्षांनी घटले आहे. या संस्थेने 1998 ते 2016 या 18 वर्षांतील प्रदूषणाचा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यावरून गंगा प्रदूषणाची बाब चिंताजनक असल्याचे चित्र स्पष्ट होते. गंगा नदीच्या प्रदेशात होणारे प्रदूषण हे उर्वरित देशातील प्रदूषणापेक्षा तिप्पट धोकादायक आहे. असंही या अहवालात म्हटलं आहे. गंगा नदीच्या पठाराची व्याती मोठ्या प्रमाणात आहे. यात बिहार, चंदिगड, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. या राज्यांमध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांपैक्षा अधिक लोक  राहतात.

हेही वाचा - महाराष्ट्रातील तब्बल 17 शहरे प्रदूषित; तातडीने उपाययोजना करण्याची सूचना

मागील 18 वर्षाच्या काळात या राज्यातील प्रदूषणात दुप्पटीने वाढ झाली असून येथे हवा प्रदूषणाची पातळी वाढली आहे. 2016 पर्यंत गंगा पठारावरील राज्यात प्रदूषणात 72 टक्के वाढ झाली. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान 3.4 ते 7.1 वर्षांनी घटले आहे. भारत ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू’ कार्यक्रमांतर्गत ठरवेले लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाल्यास हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. हवेतील प्रदूषण कमी झाल्यास गंगा नदी पठारावरील भारतीयांचे सरासरी आयुर्मान 1.3 वर्षांनी वाढू शकते.

हेही वाचा - वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी 'या' उपायांचा आधार घ्या!

दरम्यान, महाराष्ट्रातदेखील दिवसेंदिवस वायू प्रदूषणाची समस्या वाढत आहे. मागच्या वर्षी पर्यावरण मंत्रालयाने देशातील 102 प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली होती. तातडीने या प्रदूषणावर काहीतरी उपाययोजना राबवण्यात यावी अशी सूचनाही केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनाचे या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही. या यादीमध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राती शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर आणि उल्हासनगर इत्यादी शहरांचा समावेश आहे.