Jharkhand Naxalite Encounter: झारखंडमधील चाईबासा जिल्ह्यातील गुवा पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार माओवादी नक्षलवादी ठार झाले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. चाईबासाचे एसपी आशुतोष शेखर यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. चार नक्षलवादी ठार झाल्याची माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चकमकीच्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. मारल्या गेलेल्या तीन नक्षलवाद्यांना सरकारने बक्षीस जाहीर केले होते. यामध्ये झोनल कमांडर सिंगराई उर्फ मनोज, 10 लाखांचे बक्षीस, सब-झोनल कमांडर कांदे होनहागा उर्फ दिरशुम, 5 लाखांचे बक्षीस, एरिया कमांडर सूर्या उर्फ मुंडा देवगम, 2 लाखांचे बक्षीस आहे. याशिवाय जंगा पूर्ती उर्फ मारला असे मृत्यू झालेल्या महिला नक्षलवादीचे नाव आहे. असे सांगण्यात आले की, पेरूच्या जंगलात नक्षलवादी जमल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पोलिसांचे पथक संयुक्त गस्तीवर गेले होते.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. जवानांनीही पोझिशन घेत प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर चाललेल्या चकमकीत घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. दोन नक्षलवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. काही नक्षलवादी जखमी झाल्याचीही माहिती आहे. सुरक्षा दलाकडून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.