Cyber Crime, SBI | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स अनेक प्रकारचे व्हायरस वापरतात. त्यासाठी व्हायरस तुमच्या फोनवर डाउनलोड करण्यासाठी ते फिशिंग संदेश पाठवतात. अशाच एका व्हायरसबाबत बँकांच्या ग्राहकांना सावध केले जात आहे. यात प्रामुख्याने SBI, PNB आणि कॅनरा बँक आणि इतरही बँकांच्या ग्राहकांना SOVA मालवेअरबद्दल (Malware) इशारा दिला जात आहे. SBI ने ट्विट केले आहे की, 'तुमच्या मोबाईल फोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या मालवेअरला प्रवेश करु देऊ नका. नेहमी विश्वसनीय स्त्रोतांकडून विश्वसनीय अॅप्स डाउनलोड करा. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करु नका. कोणत्याही मोहाला बळी पडू नका.

काय आहे SOVA व्हायरस?

एसबीआयच्या माहितीनुसार, SOVA हा Android-आधारित ट्रोजन मालवेअर आहे. जो वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी बनावट बँकिंग अॅप्स वापरून लोकांना लक्ष्य करत आहे. हा मालवेअर वापरकर्त्यांची माहिती आणि ओळख चोरतो. नेट-बँकिंग अॅप्सद्वारे वापरकर्त्याने त्यांच्या खात्यात प्रवेश केल्यावर आणि लॉग इन केल्यावर मालवेअर त्यांची माहिती रेकॉर्ड करतो. हा व्हायरस एकदा का तुमच्या मोबाईलमध्ये शिरला की, नंतर त्याला बाहेर काढण्याचा कोणताच मार्ग नाही. त्यामुळे सावधान, असेही एसबीआयने म्हटले आहे. (हेही वाचा, SOVA Trojan Virus: भारतात नव्या Mobile Banking Virus ची दहशत; Android Phone वरून मोबाईल बॅकिंग करताना सावध राहण्याचा CERT-In चा रिपोर्ट)

मालवेअर कसे काम करते?

पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाइटनुसार, SOVA ट्रोजन मालवेअर इतर कोणत्याही Android ट्रोजनप्रमाणेच फिशिंग एसएमएसद्वारे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर पाठवले जाते. हे बनावट अँड्रॉइड अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या इतर अॅप्सचे तपशील C2 (कमांड अँड कंट्रोल सर्व्हर) वर पाठवते, जे हॅकर्स नियंत्रित करतात.

तुम्ही काय करायला हवे?

जर हा मालवेअर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल झाला असेल तर तो काढून टाकणे कठीण आहे. हे टाळण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे सावधगिरी. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. अॅप्स डाउनलोड करण्यासाठी नेहमी विश्वसनीय अॅप स्टोअर वापरा.

ट्विट

कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यू तपासा. अ‍ॅप्सना परवानग्या देताना काळजी घ्या आणि अ‍ॅप्सना तुम्ही कोणत्या गोष्टींवर परवानग्या देत आहात याकडे लक्ष द्या. अँड्रॉइड अपडेट्स डाऊनलोड करत राहा आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अँटी व्हायरस देखील वापरू शकता.